केंद्र सरकार करणार युवकांचे कौशल्य ‘मॅपिंग’; जी-२० मध्ये पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन

पुण्यात सुरु असलेल्या जी-२० शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला गुरूवारी पंतप्रधान मोदी यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित केले.

केंद्र सरकार करणार युवकांचे कौशल्य ‘मॅपिंग’; जी-२० मध्ये पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन
PM Narendra Modi

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आपल्या युवकांना (Youth) सतत कौशल्य (Skills), नव्याने कौशल्य प्रशिक्षण (Skill Training) आणि कौशल्य अद्ययावत करून भविष्यासाठी सज्ज बनवण्याची गरज आहे. तरुण ज्या क्षेत्रात काम करतात, तिथल्या पद्धतींबाबत त्यांच्या क्षमता तपासणे आवश्यक असून त्याअनुषंगाने सरकार कौशल्य मॅपिंग कार्यक्रम (Skill Mapping Program) हाती घेत आहे. शिक्षण, कौशल्य आणि कामगार मंत्रालये या उपक्रमावर एकत्रितपणे काम करत आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरूवारी दिली.

पुण्यात सुरु असलेल्या जी-२० शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला गुरूवारी पंतप्रधान मोदी यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा, सभ्यतेचा पायाच उभा नाही, तर आपल्या मानवतेच्या भविष्याला आकार देणारे संरचनाकारही आहे. शिक्षणमंत्री याचे नेतृत्व करणारे शेर्पा आहेत, असा उल्लेख करत, हे शेर्पा, मानवसमूहाला सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीच्या प्रवासाची दिशा दाखवत आहेत, असे त्यांनी सांगितले.

जातीवरून भेदभाव करणाऱ्यांची आता खैर नाही; ‘यूजीसी’ ची राहणार करडी नजर

भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु केली आहे. पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ई-लर्निंगच्या पद्धतींचा अभिनव वापर करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्याचे उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह, दर्जेदार शिक्षण देणे, हेच असले पाहिजे, असेही स्पष्ट केले. ह्या दिशेने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. इतर देशांना, विशेषतः ग्लोबल साऊथ देशांना, आपले अनुभव, ज्ञान आणि संसाधने यांची मदत देण्यास भारत आनंदाने तयार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

डिजिटल तंत्रज्ञान तोल सांभाळण्याचे काम करते आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते असे मत पंतप्रधानांनी मांडले. शिक्षणात प्रवेश वाढवणे आणि भविष्यातील गरजांशी जुळवून घेणे यासाठी हे एक शक्तीवर्धक आहे. शिकणे, कौशल्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठी क्षमता प्रदान करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचाही त्यांनी उल्लेख केला. तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हाने यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी त्यांनी जी-20 च्या भूमिकेवर भर दिला.

आरटीईच्या 'त्या' विद्यार्थ्यांचे शुल्क राज्य शासनाने द्यावे : धर्मेंद्र प्रधान

भारताने देशभरात दहा हजार ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापन केल्या आहेत. आमच्या शाळकरी मुलांसाठी संशोधन आणि नवोन्मेषाच्या संगोपनशाळा म्हणून काम त्या करतात असे सांगत संशोधन आणि नवोन्मेषावर दिलेल्या भरावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. आपल्या मुलांच्या आणि तरुणांच्या भविष्यासाठी जी २० शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “शिक्षण हे या सर्व प्रयत्नांचे मुळ आहे”, सर्वसमावेशक, कृती-केंद्रित आणि भविष्यासाठी सज्ज शिक्षणाचा अजेंडा ही बैठकीची फलनिष्पत्ती असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “वसुधैव कुटुंबकम् – एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य” या खर्‍या भावनेतून संपूर्ण जगाला याचा फायदा होईल”, असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo