IIT च्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीचे सावट ; तब्बल 38 टक्के विद्यार्थी बेरोजगार 

2023-2024 या शैक्षणिक वर्षाचे प्लेसमेंटची प्रक्रिया पूर्ण होत असताना IIT मध्ये प्रवेश घेतलेल्या 21, 500 विद्यार्थ्यांपैकी फक्त 13,410 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे तर 38 टक्के विद्यार्थी बेरोजगार राहिले आहेत.

IIT च्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीचे सावट ; तब्बल 38 टक्के विद्यार्थी बेरोजगार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

IIT च्या काही विद्यार्थ्यांना देश परदेशातील नामांकित कंपन्यानमध्ये करोडो रुपयांचे पॅकेज मिळत असल्याचे चित्र एकीकडे आहे, तर दुसरीकडे IIT च्या  विद्यार्थ्यांवर बेरोजगारीचे सावट (students also face unemployment)असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

IIT च्या एका विद्यार्थ्याने माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीत समोर आलेल्या आकडेवारीनुसार IIT जॉब प्लेसमेंट 2024 मध्ये परिस्थिती वाईट दिसत आहे. या वर्षात आतापर्यंत 38% विद्यार्थी बेरोजगार आहेत. एवढेच नव्हे तर  देशातील शीर्ष संस्था बी.टेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांची मदत (Alumni Help)घेत असल्याचेही समोर आले आहे.

IIT कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंग यांनी RTI अंतर्गत अर्ज करून देशातील 23 IIT मध्ये नोकरी प्लेसमेंट 2024 चा अहवाल मागवला होता. आयआयटीमध्ये प्रवेश घेतला की चार वर्षांनी लाखो पगाराची खात्री असते. जुने आकडे देखील हे सिद्ध करतात. म्हणूनच दरवर्षी मुलं आयआयटी जेईई परीक्षेची जोरदार तयारी करतात. पण गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीतून  वेगळीच माहिती समोर येत आहे. मागील वर्षी म्हणजे 2023 च्या तुलनेत यावर्षी बेरोजगार विद्यार्थ्यांच्या आकडेवारीत 17 टक्याने वाढ झाली आहे. 

देशभरातील सर्व IIT मधून 2022 या वर्षी एकूण 17,900 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यापैकी   14,490 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आणि 3,410 हजार म्हणजे सुमारे 20 टक्के विद्यार्थी बेरोजगार राहिले.  2023 सली प्रवेश घेतलेल्या  20,000 विद्यार्थ्यांपैकी 15,830 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली तर  4,170 म्हणजे सुमारे  21% विद्यार्थी बेरोजगार राहिले. आता 2023-2024 या शैक्षणिक वर्षाचे प्लेसमेंटची प्रक्रिया पूर्ण होत असताना IIT मध्ये प्रवेश घेतलेल्या 21, 500 विद्यार्थ्यांपैकी फक्त 13,410 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे तर 38 टक्के विद्यार्थी बेरोजगार राहिले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान IIT मुंबई, IIT दिल्ली प्रशासनाने त्यांच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात मदत व्हावी, यासाठी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागितली असल्याचे समोर आले आहे.