मुंबईमध्ये मराठी तरुणांना नोकरीसाठी 'नो एन्ट्री'; कंपनीची जाहिरात व्हायरल.. 

मुंबईतील ITCODE Infotech कंपनीने जाहिरामध्ये मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असे म्हटले आहे.

मुंबईमध्ये मराठी तरुणांना नोकरीसाठी 'नो एन्ट्री'; कंपनीची जाहिरात व्हायरल.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबईतील ITCODE Infotech कंपनीने (ITCODE Infotech Company) ग्राफिक डिझायनरची (Graphic Designer) जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त (Controversial advertising) ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये (Marathi candidates should not apply) असे म्हटले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मराठी तरुणांना नोकरीसाठी नो एन्ट्री म्हणणाऱ्या या कंपनीच्या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला. 

लिंक्डइनवरील एक जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे . जान्हवी सराना या नावाने लिंक्डइनवर एक जाहिरात करण्यात आली. त्यामध्ये मुंबईत ग्राफिक्स डिझायनरसाठी जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातील एका कार्यालयात ही नोकरी होती. तरीही या नोकरीच्या जाहिरातीत मराठी लोकांनी अर्ज करू नये,असे म्हटले होते. त्यामुळे मराठी तरुण संताप व्यक्त करत आहेत. 

ITCODE Infotech या कंपनीसाठी ही जाहिरात करण्यात आली होती. ही सूरतची कंपनी असल्याचे एका वृत्त संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा संताप अधिक उफाळला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधित एचआर व्यक्तीने ही पोस्ट डिलिट केली आहे. तसेच, माफी मागण्यासाठी दुसरी पोस्टही लिहिली आहे. असे असले तरी जाहिरातीतील एका वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, हे नाकारता येणार नाही. 

जाहिरातीतील समाविष्ट केलेल्या सूचनेमुळे मुंबईतील मराठी माणसांच्या भावना दुखावल्या असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. नोकरीच्या निमित्ताने येथे परभाषिक लोकही वास्तव्यात आहेत. त्यामुळे हे शहर बहुभाषिक असले तरीही प्रांतरचनेनुसार मराठी ही येथील राज्यभाषा आहे, असे असतानाही एखाद्या शहरात त्याच शहराच्या भाषेला नाकारण्यात आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

आपण ज्या राज्यात राहतो, ज्या राज्यामुळे आपली रोजी-रोटी चालते त्या राज्याची राज्याभाषा शिकणे, तिथली संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु, कायद्यातील या तरतुदींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे ? की काय अशी परिस्थिती यानिमित्ताने निर्माण झाली आहे. कारण गेल्या काही वर्षांत मुंबईतच मराठी भाषेचा अपमान होत असल्याच्या काही घटना सातत्याने समोर येत आहेत.