NEP 2020 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुंबई, कोल्हापूरपेक्षा मागे; डॉ. नितीन करमळकर यांची खंत

केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विद्यापीठांना दिलेल्या आहेत.

NEP 2020 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुंबई, कोल्हापूरपेक्षा मागे; डॉ. नितीन करमळकर यांची खंत
Dr. Nitin Karmalkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP 2020) अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विद्यापीठांना (Universities in Maharashtra) दिलेल्या आहेत. मात्र, प्रत्येक गोष्टीत आघाडीवर असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मात्र NEP च्या अंमलबजावणीत मागे असल्याची खंत खुद्द सुकाणू समितीचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर (Dr. Nitin Karmalkar) यांनी ‘एज्युवार्ता’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली आहे. त्यातुलनेत मुंबई (Mumbai University) व शिवाजी विद्यापीठाने यामध्ये आघाडी घेतल्याचेही करमळकर यांनी आवर्जून सांगितले.

एनईपीच्या अंमलबजावणीविषयी बोलताना डॉ. करमळकर यांनी सांगितले की, मी पुणे विद्यापीठाचा माजी कुलगुरू आहे. पण विद्यापीठात म्हणावी तशी तयारी झाली नाही. गेल्या वर्षभरात एनईपीच्या संदर्भात जनजागृतीच्यादृष्टीने काही गोष्टी घडल्या असतील. पण फक्त जनजागृती करून काही गोष्टी होणार नाहीत. प्रत्यक्षात त्यातील अभ्यासक्रम, मांडणी, संरचनात्मक बदल आहेत, याबाबतीत मुंबई विद्यापीठातील तेथील स्वायत्त महाविद्यालये, त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचा जीव लहान असूनही तयारीही खूप चांगली झाली आहे.

NEP अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांचा 'MBA' प्रवेशाकडील कल वाढला

आम्ही प्रत्यक्ष भेटी देतोय. प्रत्येक विद्यापीठात समितीचा एक सदस्य प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून विद्यापीठांच्या समस्यांची उकल करण्याच्यादृष्टीने, त्यांची तयारी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे शिवाजी विद्यापीठ होते. या विद्यापीठाचे आज अभ्यासक्रम तयार झाले, अभ्यास मंडळाने मंजुरी दिली. त्याही व्यतिरिक्त त्यांच्या कॅम्पसमध्ये ३५ ते ४० पदव्युत्तर पदवी कोर्सेसचा अभ्यासक्रम तयार आहे. त्यानंतर इंटर्नशिप, कौशल्य विकासाच्या दृष्टीने त्यांनी पार्टनर शोधले आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातही असेच सुरू आहे. इतर विद्यापीठे त्यामानाने लहान आहेत. पण नागपूर, औरंगाबाद विद्यापीठामध्ये चांगली तयारी सुरू आहे. पुणे विद्यापीठाची तयारी थोडी मागे पडली आहे. मधल्या काळात पूर्णवेळ कुलगुरू नसणे. या अडचणींवर आता मात झाली आहे. नवीन कुलगुरू आले आहेत. येणाऱ्या काळात ते हा बॅकलॉग भरून काढतील, अशी अपेक्षाही डॉ. करमळकर यांनी व्यक्त केली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD