Mumbai University: दुषीत पाण्याचा मुद्दा सभागृहात गाजला; सरकारची कबुली, चौकशीचे आदेश 

विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दर्जेदार सुविधा देण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai University: दुषीत पाण्याचा मुद्दा सभागृहात गाजला; सरकारची कबुली, चौकशीचे आदेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठात (Mumbai University) काही दिवसांपुर्वी दुषीत पाण्यामुळे वसतिगृहातील (Contaminated hostel water) ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असा त्रास होत असल्याचे समोर आले. हाच मुद्दा पुढे करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कबुली देत चौकशीचे आदेश दिले आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील वसतिगृहामध्ये गैरसोय असून, दूषित पाणी, निकृष्ट अन्नामुळेच मुलींची तब्बेत खालावली, अशी कबुलीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दर्जेदार सुविधा देण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी आमदार विलास पोतनीस यांनी प्रश्न मांडला. कलिना संकुलात दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नवीन महिला वसतिगृहाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. झाडेझुडपे वाढल्याने साप वगैरे येतात. आपत्कालीन परिस्थितीत आवारात एकही रुग्णवाहिका नाही, याकडेही पोतनीस यांनी लक्ष वेधले.

त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कलिना संकुलात असलेल्या तीन वसतिगृहांची एकूण क्षमता १४४ आहे. २०२३-२४ मध्ये १३७ जणांनी प्रवेश घेतला आहे. एप्रिलमध्ये अचानक काही मुलींना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या प्रकरणी चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रत्येक मुलीची वैयक्तिक भेट घेऊन विचारपूस केली. परंतु, या वसतिगृहात निकृष्ट अन्न आणि दूषित पाणी नाही. हे आम्ही अमान्य करत नाही; परंतु, हा त्रास नव्याने मुंबईत आलेल्या मुलींना झाला होता.