Medical Admission : दहा हजार जागांसाठी ४७ हजार विद्यार्थी गुणवत्ता यादीत, पाहा प्रवेशाची स्थिती

एमबीबीएस आणि बीडीएसची पहिली अंतिम निवड यादी ४ ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. त्याआधी मंगळवारी गुणवत्ता यादी तसेच महाविद्यालयनिहाय जागांची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

Medical Admission : दहा हजार जागांसाठी ४७ हजार विद्यार्थी गुणवत्ता यादीत, पाहा प्रवेशाची स्थिती
MBBS, BDS Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात सीईटी सेलकडून (State CET Cell) वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची (Medical Education) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (दि. १) एमबीबीएस (MBBS) व बीडीएस (BDS) प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली असून या यादीत जवळपास ४७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात प्रवेश क्षमता केवळ १० हजार एवढीच असल्याने यंदाही एमबीबीएसमध्ये प्रवेशासाठीचे कटऑफ (Cut Off) अधिक असणार, हे स्पष्ट झाले आहे.

सीईटी सेलकडून एमबीबीएस आणि बीडीएसची पहिली अंतिम निवड यादी ४ ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. त्याआधी मंगळवारी गुणवत्ता यादी तसेच महाविद्यालयनिहाय जागांची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या स्थानावर असलेला विद्यार्थी हा नीटच्या ऑल इंडिया रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावरील आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील विद्यार्थी ४४ व्या क्रमांकावर आणि अखेरचा म्हणजे ४६ हजार ९५९ वा विद्यार्थी ऑल इंडिया रँकिंगमध्ये १२ लाख २२ हजार १४८ व्या क्रमांकावरील आहे.

Vertical University : महाराष्ट्र सरकारकडून निकष जाहीर; जागा, इमारत, सोयीसुविधा, पात्रतेच्या अटी पाहा...

राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसची एकूण प्रवेश क्षमता ४ हजार ९५० एवढी आहे. त्यापैकी ७७६ जागा या ऑल इंडिया कोट्यातील आहेत. म्हणजे शासकीय महाविद्यालयांमध्ये राज्यासाठी ४ हजार १५४ जागा शिल्लक राहतात. तर खासगी महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमता ३ हजार १७० एवढी आहे.

बीडीएस अभ्यासक्रमाच्या शासकीय महाविद्यालयांतील जागा केवळ ३२६ असून त्यापैकी ४८ जागा ऑल इंडिया कोट्यातील आहेत. तर खासगी संस्थांमध्ये २ हजार ४०० जागा उपलब्ध आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून एकूण जागा १० हजार ८४६ एवढ्या असून त्यापैकी ८२४ जागा या ऑल इंडिया कोट्यातील असल्याने गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठी केवळ १० हजार जागा शिल्लक राहतात. नोंदणी केलेले विदयार्थी आणि प्रवेश क्षमता यामध्ये मोठी तफावत असल्याने यंदाही प्रवेशासाठी मोठी चुरस असणार, असेच चित्र आहे.

दरम्यान, दि. १ ऑगस्टपासून पसंतीक्रम भरण्यास सुरूवात झाली असून दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. तर दि. ४ ऑगस्ट रोजी पहिली फेरीची निवड यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि. ५ ते ९ ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

SPPU News : मुक्त व दुरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू, विद्यार्थ्यांचा कल वाढतोय

आयुष अभ्यासक्रमांसाठी ४ ते ९ ऑगस्टदरम्यान नोंदणी

बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी आणि बी (पी अँन्ड ओ) या अभ्यासक्रमांसाठी ४ ते ९ ऑगस्टदरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही. या कालावधीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा एमबीबीएस व बीडीएस प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. या अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी १३ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे.

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता

शासकीय एमबीबीएस – ४,९५०

खासगी एमबीबीएस – ३,१७०

शासकीय बीडीएस – ३२६

खासगी बीडीएस – २,४००

गुणवत्ता यादीतील विद्यार्थी संख्या – ४६,९५९

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD