बापरे... काय सांगता ! विद्यापीठाच्या वसतिगृहात घुसला साप      

वस्तीगृहाच्या आवारात फिरत असलेल्या सापाचा व्हिडिओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये साप फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका विद्यार्थ्याने वस्तीगृहाच्या आवारात फिरत असलेल्या सापाचा व्हिडिओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असून याबाबत विद्यापीठ प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.                

   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यापीठाचा परिसर हा हिरवागार असल्यामुळे येथे मोरासह विविध पक्षी वास्तव्यास आहेत. विद्यापीठातील वसतिगृहाच्या आजूबाजूला घनदाट झाडी आहे. त्यामुळे बऱ्याचदा  विद्यापीठाच्या आवारात साप फिरताना दिसतात. परंतु, वसतिगृह क्रमांक सात मध्ये विद्यार्थ्यांच्या खोली बाहेर साफ फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या रूमच्या खिडक्यांच्या काचा आणि दरवाजे नेहमी बंद ठेवावेत,असे विद्यार्थी एकमेकांना सांगत आहेत.                

  विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे म्हणाले, वसतिगृहात विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही सुध्दा वसतिगृह प्रमुखाची जबाबदारी आहे. परंतु, त्यांच्याकडून या जबाबदारीचे पालन केले जात नाही.  एखाद्या विद्यार्थ्याला सर्पाने दंश केल्यास आणि त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण ?. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत वेळीच लक्ष द्यावे.