एक्स-कॅटरियन कला ग्रुपतर्फे "गुरु-शिष्य" कला प्रदर्शनाचे आयोजन

"गुरु-शिष्य" अशी थीम असलेले हे प्रदर्शन ७ ते ९ जून रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण कला दालन येथे सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले असणार आहे.

एक्स-कॅटरियन कला ग्रुपतर्फे "गुरु-शिष्य" कला प्रदर्शनाचे आयोजन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील मुकुंदनगर येथील सेठ दगडूराम कटारिया हायस्कुलमधील माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला शिक्षिकेसाठी एका अनोख्या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शाळेतील माजी कला शिक्षिका शैलजा पाठक यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत असताना, त्यांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी कला क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येत हे विशेष कला प्रदर्शन आयोजिले आहे.  

"गुरु-शिष्य" अशी थीम असलेले हे प्रदर्शन ७ ते ९ जून रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण कला दालन येथे सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनव कला विद्यालयाचे माजी प्राध्यापक मिलिंद फडके आणि धनंजय सस्तेकर या दोन नामवंत कलाकारांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी विद्यार्थी मृणाल केंची याने सांगितली.  

या कला प्रदर्शनात कटारिया हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी "गुरु-शिष्य" या थीमवर आधारित १०० हुन अधिक विविध तैलचित्रे काढली आहेत. तसेच यामध्ये शाळेतील आजी-माजी शिक्षकांचे देखील तैलचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.

या कलाकृतींचे कौतुक करण्याची, जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्याची आणि प्रेरणादायी शिक्षकाचा उल्लेखनीय प्रभाव साजरा करण्याची ही एक अद्भुत संधी असल्याची भावना माजी विद्यार्थिनी अपर्णा आपटे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी डॉक्टर, अभियंते आणि डिझायनर यांच्यासह विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 'एक्स-कटारियन कला ग्रुप स्थापन केला होता.