PCM आणि PCMC मधील इयत्ता 11 वी प्रवेशाच्या झिरो राऊंडला सुरूवात

अर्ज भरून पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे.

PCM आणि PCMC मधील इयत्ता 11 वी प्रवेशाच्या झिरो राऊंडला सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील (Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporation) कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील (11th Online Admission Process) झिरो राऊंड आज पासून सुरू झाला आहे. अर्ज भरून पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional quality list published) वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे. 

प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये कला शाखेसाठी ५ हजार ५२५ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. वाणिज्य शाखेसाठी २४ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे तर विज्ञान शाखेसाठी ३९ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास ६९२ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती तसेच विद्यार्थी गुणांमध्ये काही दुरूस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांच्या हरकती विद्यार्थी लॉगिन मधून GRIEVANCE TOOLS द्वारे नोंदविणे आवश्यक आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून गुणवत्ता यादी दुरूस्ती बाबत हरकतींचे ऑनलाइन निराकरण केले जाईल. दिनांक १८ जून ते २१ जून पर्यंत विद्यार्थ्यांना कनिष्ठ  महाविद्यालयामधील इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा तसेच मायनॉरिटी कोटा अंतर्गत इयत्ता अकरावीचे प्रवेश निश्चित करता येणार आहेत. इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा तसेच मायनॉरिटी कोटा अंतर्गत अकरावीचे प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येणार नाही, असे प्रेस नोटमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.