बेरोजगारी का वाढली ? ; देशातील 93 टक्के महाविद्यालये 100 टक्के प्लेसमेंटसाठी असक्षम , अनस्टॉप टॅलेंट रिपोर्ट 

“अनस्टॉप टॅलेंट रिपोर्ट” च्या 2024 च्या अहवालनुसार भारतातील केवळ 7 टक्के महाविद्यालये त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट देण्यास सक्षम आहेत.

बेरोजगारी का वाढली  ? ;  देशातील 93 टक्के महाविद्यालये 100 टक्के प्लेसमेंटसाठी असक्षम , अनस्टॉप टॅलेंट रिपोर्ट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अमुक एका उच्च शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्याला मिळाली कोट्यावधी रुपयांची नोकरी (A job worth crores of rupees),  अमुक महाविद्यालयातील इतक्या विद्यार्थ्यांना मिळाली परदेशात नोकरी (job abroad), अशा अनेक बातम्या नेहमी येत असतात. पण महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्लेसमेंट संदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. “अनस्टॉप टॅलेंट रिपोर्ट” (Unstop Talent Report) च्या 2024 च्या अहवालनुसार भारतातील केवळ 7 टक्के महाविद्यालये (college)त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट (Campus Placement)देण्यास सक्षम आहेत. याचाच अर्थ तब्बल 93 टक्के महाविद्यालये 100 टक्के प्लेसमेंट देण्यास असक्षम आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे इतर महाविद्यालये त्यांच्या विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण (Skilled Education)देण्यास असमर्थ आहेत. हा अहवाल देशभरातील 11,000 हून अधिक विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि मानव संसाधन व्यावसायिकांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. 

“अनस्टॉप टॅलेंट रिपोर्ट” नुसार  66 टक्के कंपन्या आणि 42 टक्के शैक्षणिक संस्थां हे मान्य करतात की त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये नाहीत. तसेच ते नोकरीसाठी पूर्णपणे तयार नाहीत. अहवालात असे नमूद केले आहे की 88 टक्के मानव संसाधन (एचआर) व्यावसायिक  पदवी किंवा अनुभवावर याचा विचार करून उमेदवारांना संधी देत नाहीत. त्यांच्यासाठी, उमेदवाराकडे आवश्यक कौशल्ये असणे सर्वात महत्वाचे आहे. त्यानंतर अनुभव, शिक्षण, शिफारसी, इंटर्नशिप किंवा प्रकल्प याचा विचार केला जातो.

या अहवालात असेही म्हटले आहे की,  नोकऱ्या कपातीच्या भीतीमुळे 60 टक्के विद्यार्थी जास्त पगारापेक्षा नोकरीच्या सुरक्षिततेला अधिक महत्त्व देतात. बिझनेस स्कूलचे बहुतेक विद्यार्थी मोठ्या आणि प्रस्थापित कंपन्यांमध्ये काम करण्यास प्राधान्य देतात. तर त्यांच्यामध्ये  स्टार्टअप्सचे आकर्षण कमी होत आहे. 
या अहवालानुसार, बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मार्केटिंग हे सर्वाधिक पसंतीचे क्षेत्र आहे. तर कला आणि विज्ञानाचे विद्यार्थी फायनान्स आणि ॲनालिटिक्स निवडण्यास प्राधान्य देतात. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पुरुषांना सरासरी पगार 6-10 लाख रुपये प्रतिवर्ष आहे, तर महिलांना 2-5 लाख रुपये वार्षिक मिळतात. बिझनेस स्कूलमध्ये 55 टक्के पुरुषांना 16 लाखांपेक्षा जास्त पॅकेज मिळते, तर महिलांमध्ये हे प्रमाण केवळ 45 टक्के आहे,असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.