NEP अंमलबजावणीत प्राचार्यांची भूमिका महत्त्वाची : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा व शहरातील प्रचार्य आणि संचालक यांच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

NEP अंमलबजावणीत प्राचार्यांची भूमिका महत्त्वाची : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy)हे विद्यार्थी केंद्री असून विद्यार्थ्याला अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य आहे. त्यासाठी अद्ययावत अभ्यासक्रमाच्या आराखडा महत्त्वाचा ठरत आहे.  महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्यातील दुवा असून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत प्रचार्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी एनईपी'ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण राबवावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Savitribai Phule Pune University Vice Chancellor Dr. Suresh Gosavi)यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा व शहरातील प्रचार्य आणि संचालक यांच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोसावी बोलत होते. कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्र. कुलगुरू डॉ.पराग काळकर उपस्थित होते.विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठता डॉ. यशोधन मिटारे,  विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील , विद्यापीठाच्या आयक्युएसीचे संचालक डॉ. संजय ढोले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाळे, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या आराखडा अद्ययावत करण्याचे काम सुरू असून उच्च शिक्षणातून कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मितीला चालना देऊन उद्योगांशी अभ्यासक्रम जोडून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. 

डॉ. विजय खरे यांनी विद्यार्थ्यांना वैश्विक असे उपजत, पारंपरिक ज्ञान परंपरेतील शिक्षण, ज्ञान अवगत करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातून १०९  प्राचार्य सहभागी झाले होते. प्रश्नोत्तराच्या सत्रात सहभागी प्रचार्यांच्या प्रश्नांना प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर व कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी उत्तरे देऊन संवाद साधला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. व्ही. एन. शिंदे, डॉ. लतेश निकम, आयक्युएसी प्रमुख डॉ. रमाकांत जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी औटी यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.