SPPU NEWS: विद्यापीठात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; सुरक्षा विभाग हतबल

विद्यापीठातील बॉटनिकल गार्डनमधील आणि ललित कला केंद्रातील चंदनाची झाडे चोरीला गेली आहेत.तसेच टीचर्स कोटर्समधील एका बंद खोलीचे लॉक तोडून नळ चोरीला गेले आहेत.

SPPU NEWS: विद्यापीठात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; सुरक्षा विभाग हतबल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी (thieves)सुळसुळाट माजवला असून त्यांना आळा घालण्यात विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला (University Security Department) पूर्णपणे अपयश आले आहे. विद्यापीठ आवारातील चंदनाच्या झाडांची (Sandalwood trees) आणि राहिवाशी इमारतीतील बाथरूममधील महागड्या नळांची चोरी (Theft of bathroom faucets) झाली आहे.त्यामुळे अशा भुरट्या चोरांना कोण आणि कसा आळा घालणार? असा प्रश्न उपस्थित होत  आहे. 

विद्यापीठातील बॉटनिकल गार्डनमधील आणि ललित कला केंद्रातील चंदनाची झाडे चोरीला गेली आहेत.याबाबत संबंधित विभागाच्या प्रमुखांना पोलिसांना तक्रार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच काही दिवसांपूर्वी टीचर्स कोटर्समधील एका बंद खोलीचे लॉक तोडून नळ चोरीला गेले आहेत.त्याचप्रमाणे पूर्वीच्या युजीसी ऑफिसमधील पाईप चोरीला गेले आहेत.सुमारे महिन्याभारांपूर्वी भूरट्या चोरांनी विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याला दगड मारल्याची घटना घडली होती. 

विद्यापीठच्या सुरक्षा विभागात अधिकाऱ्यांची कमतरता नाही.तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही कमतरता नाही.मग भुरट्या चोरांना पकडण्यात सुरक्षा विभागाला अपयश का येत आहे,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्यावर सुरक्षा विभाग सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.  

----------------------------------------

विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना काही महिन्यांपूर्वी नवीन गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, या निर्णयाचे काय झाले? कर्मचारी विद्यापीठातर्फे देण्यात आलेला गणवेश का परिधान करत नाही? गणवेशासाठी विद्यापीठाने केलेला खर्च पाण्यात गेला का? असे अनेक सवाल सुरक्षा विभागाबाबत उपस्थित केले जात आहेत.त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागात सुधारणा केव्हा होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

-------------------------------------

चंदन चोरीबाबत संबंधितांना पोलिसांकडे तक्रार देण्याच्या सूचना दिल्या आहेत.मात्र, नळ चोरीबाबत सुरक्षा विभागाकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही.परंतु,विद्यापीठाची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रियाराबवली जात आहे.
- डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

--------------------------------------------

विद्यापीठात महाराष्ट्रासह विविध राज्यातून व देशातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.त्यामुळे विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे.विद्यापीठाने तात्काळ भूरट्या चोरांचा बंदोबस्त करावा.लॉक तोटून चोर चोरी करेपर्यंत सुरक्षा विभाग काय करते.विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधून काही वस्तू चोरीला गेल्या तर त्याला जबाबदार कोणाला धरणार ? त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करावी.

- संतोष ढोरे, माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ