मेडिकल प्रवेशासाठी नीटचे नवे रँक जाहीर; टॉपर्सची संख्या घटली

NEET UG 2024 च्या सर्व विद्यार्थ्यांचे म्हणजेच पुनर्परीक्षेत बसलेल्या उमेदवारांचे सुधारित स्कोअर कार्ड https://exams.nta.ac.in/NEET या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहे.

मेडिकल प्रवेशासाठी नीटचे नवे रँक जाहीर; टॉपर्सची संख्या घटली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (NTA) वैद्यकीय प्रवेशांसाठी २३ जून २०२४ रोजी पुनर्परीक्षा (re-examination) घेण्यात आली होती. या फेर परीक्षेला बसलेल्या एकूण १ हजार ५६३ विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल (result) जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर एनटीएने नीट यूजी (NEET-UG) २०२४ च्या सर्व विद्यार्थ्यांच्या रँकमध्येही (Exam Rank) सुधारणा केली आहे. NEET UG 2024 च्या सर्व विद्यार्थ्यांचे म्हणजेच पुनर्परीक्षेत बसलेल्या १,५६३ उमेदवारांसह सुधारित स्कोअर कार्ड (Score Card) https://exams.nta.ac.in/NEET या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ८१३ विद्यार्थ्यांपैकी कोणीही पैकीच्या पैकी म्हणजेच ७२०/७२० गुण मिळवू शकले नाहीत. तर टॉपर्सची संख्या ६७ वरून ६१ वर आली आहे. यापूर्वी ७२०/७२० गुण प्राप्त केलेल्या ६ पैकी ५ विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती. त्यांना आता ६८० च्या वर गुण मिळाले आहेत.

नीट परीक्षेबाबत अनेक घडामोडी समोर येऊ लागल्या आहेत. त्यात या परीक्षेमध्ये कथित पेपरफुटी आणि गैरप्रकार झाल्याचे आरोप झाल्याने एनटीए वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नीट परीक्षेतील निकालात १ हजार ५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यावरून देशभरात अनेक आंदोलन देखील करण्यात आली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचले आहे.

एनटीएने १,५६३ विद्यार्थ्यांचा २३ जून रोजी झालेल्या NEET UG 2024 च्या पुनर्परीक्षेचे निकाल जाहीर केला आहे. NEET UG पुनर्परीक्षेसाठी अंतिम अन्सर की (final answer key) ३० जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या १,५६३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ८१३ विद्यार्थी या पुनर्परीक्षेसाठी बसले होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश याआधी दिले होते. न्यायालयाने या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण रद्द झालेली गुणपत्रिका स्वीकारा अथवा फेरपरीक्षेला सामोरे जा, असे दोन्ही पर्याय दिले होते.