विद्यापीठातील प्राध्यापक भरती विधानसभा निवडणूकीनंतर?; काय आहे कारण

नवीन बिंदूनावामावली तयार करून पुण्यातील मागासवर्गीय कक्षाकडून दोन दिवसांपूर्वी तपासून घेतली आहे.आता ही बिंदूनामावली मंत्रालयात तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

विद्यापीठातील प्राध्यापक भरती विधानसभा निवडणूकीनंतर?; काय आहे कारण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या 111 रिक्त जागांसाठी (111 Vacancies of Professors) विद्यापीठातर्फे भरती प्रक्रिया राबवली जात असली तरी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)अंतर्भाव करून नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे.त्यासाठी विद्यापीठाने पत्रव्यवहार सुरू केला असून सध्या मंत्रालयात नवी बिंदूनामावली तपासणीसाठी देण्यात आली आहे.त्यास सुमारे आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्याचप्रमाणे विद्यापीठाला उमेदवारांना मराठा आरक्षणानुसार पुन्हा अर्ज करण्याची संधी (Opportunity to re-apply under Maratha reservation) द्यावी लागणार आहे.या सर्व प्रक्रियेस सुमारे दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे.त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक भरती विधानसभा निवडणूकीनंतर (Professor recruitment after assembly elections)होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राध्यापक पदाच्या 111 जागांसाठी विद्यापीठाकडे 5 हजार 501 अर्ज प्राप्त झाले आहेत.मात्र, 10 टक्के मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करून नवीन बिंदूनावामावली तयार करून पुण्यातील मागासवर्गीय कक्षाकडून दोन दिवसांपूर्वी तपासून घेतली आहे.आता ही बिंदूनामावली मंत्रालयात तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.त्यामुळे पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्राध्यापक भरती करण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे.तसेच विद्यापीठाकडे प्राप्त झालेल्या अर्जात आणखी वाढ होऊ शकते.त्यातच विधानसभा निवडणूकीची आचार संहिता पुढील दोन - अडीच महिन्यात जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तत्पूर्वी नव्याने अर्ज मागवणे किंवा केवळ मराठा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना लिंक ओपन करून देणे आणि त्यानुसार प्राप्त अर्जाची छानणी करणे, ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान विद्यापीठासमोर असणार आहे. 

निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी या सर्व बाबी पूर्ण झाल्या तरीही प्रत्येक विषयासाठी सिलेक्शन कमिटी स्थापन करावी लागणार आहे.तसेच पत्र उमेदवारांना कमीत कमी 15 दिवस आधी मुलाखतीची तारीख कळवावी लागणार आहे.त्यामुळे पुढील दोन - अडीच महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करणे शक्य दिसत नाही.त्यामुळे भरती प्रक्रिया विधानसभा निवडणूकीनंतर होण्याचा अंदाज विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

-------------------------------------------

विद्यापीठातील प्राध्यापकांची पदभरती लवकरात लवकर व्हावी, यासाठी विद्यापीठ व शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे.विधानसभा निवडणूकीपूर्वी भरती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
- डॉ.देविदास वायदंडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
-----------------------------------------

प्राध्यापक भरातीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.त्यातच गेल्या तीन दिवसांपासून उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर प्राध्यापक संघटनेचे बेमुदत उपोषण सुरू आहे.लाखो पात्र उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत.मात्र,तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या वाढवून शासन या उमेदवारांची आर्थिक पिळवणूक करत आहे.त्यामुळे शासनाने 100 टक्के प्राध्यापक भरती करावी.तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त जागांसह राज्यातील इतर रिक्त जागांची भरती जलद गतीने करावी.
- संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना 

----------------------