ISRO कडून रिमोट सेन्सिंग क्षेत्रातील मोफत ऑनलाइन कोर्स
हा ऑनलाइन कोर्स भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतर्गत भारतीय रिमोट सेन्सिंग संस्थेद्वारे (आयआयआरएस) दिला जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
रिमोट सेन्सिंग क्षेत्रात (Remote Sensing Area) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ISRO कडून चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने रिमोट सेन्सिंगमध्ये आवड असलेल्या तरुणांसाठी एक विनामूल्य ऑनलाइन कोर्स (Free online course) सुरू केला आहे. हा ऑनलाइन कोर्स भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतर्गत भारतीय रिमोट सेन्सिंग संस्थेद्वारे (आयआयआरएस) दिला जात आहे.
आयआयआरएसने सुरू केलेल्या जिओलॉजिकल ॲप्लिकेशन्स कोर्ससाठी प्रगत रिमोट सेन्सिंग तंत्र रिमोट सेन्सिंग क्षेत्रातील व्यावहारिक माहिती प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. यामध्ये मॅपिंग, मॉनिटरिंग, भूस्खलन इत्यादींचा समावेश आहे. ई-क्लास प्लॅटफॉर्मद्वारे उमेदवारांना अभ्यास साहित्य पुरविले जाईल. उमेदवार eclass.iirs.gov.in/login वर जाऊन वर्ग घेऊ शकतील.
यासाठी 11 मार्च ते 15 मार्च कालावधीत चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवार नोडल केंद्रावर किंवा वैयक्तिकरित्या नोंदणी करू शकतात. isrollms.iirs.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन उमेदवार नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
या मोफत ऑनलाइन कोर्ससाठी अर्ज करणारे उमेदवार पृथ्वी विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय जिओलॉजी, अप्लाइड जिओलॉजी, जिओफिजिक्स, अर्थ सायन्स, जिओ एक्सप्लोरेशन, जिओग्राफी यांसारखे विषय आणि सिव्हिल इंजिनीअरिंग, जिओसायन्स, मायनिंग इंजिनीअरिंगमध्ये बीटेक करणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाईल. नोडल केंद्रांद्वारे नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ७० टक्के उपस्थितीच्या आधारे प्रमाणपत्र मिळेल. तर, वैयक्तिकरित्या नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सत्रात 70 तास उपस्थित राहावे लागेल. वैयक्तिकरित्या नोंदणी करणारे उमेदवार ISRO LMS द्वारे ऑनलाइन प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील.