...तर 'सीओईपी'मध्ये 'आयआयटी'चे केंद्र; चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच

माजी विद्यार्थी नियामक मंडळ, अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांच्यावतीने आयोजित अभिमान पुरस्कार वितरण समारंभात पाटील बोलत होते.

...तर 'सीओईपी'मध्ये 'आयआयटी'चे केंद्र; चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्राला आयआयटी (IIT) देण्याचे आणि त्याचे एक केंद्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला (COEP) देण्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यात केले आहे. असे सकारात्मक वातावरण असताना सीओईपीने संशोधनावर भर देऊन दिल्ली दरबारी नाममुद्रा उमटवावी, जेणेकरून त्यांना आयआयटीचे केंद्र मिळणे, सोयीचे होईल, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

 

माजी विद्यार्थी नियामक मंडळ, अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांच्यावतीने आयोजित अभिमान पुरस्कार वितरण समारंभात पाटील बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु  डॉ. सुधीर आगाशे, माजी विद्यार्थी नियामक मंडळाचे अध्यक्ष भरत गीते,  बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, सचिव डॉ. सुजित परदेशी, नियामक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

SPPU News : विद्यापीठाशी संलग्न ४० महाविद्यालये 'नॅक'कडे फिरकलीच नाहीत!

 

पाटील म्हणाले, अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासनाने स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर येथे आवश्यकतेनुसार विविध अभ्यासक्रम घेतले जात असून त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. विद्यापीठाकडे स्पर्धेची भावना असली पाहीजे. तंत्रज्ञान विद्यापीठाचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यापीठाने ज्ञान-तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत सहभागी होऊन शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करावी. विद्यापीठाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील.

आगाशे म्हणाले, विद्यापीठातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसते. माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमिस्टर मध्ये दोन तास लेक्चर दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल. विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अशिष अचलेरकर, अरूण कुदळे, विवेक फणशीकर, चेतन धारिया, डॉ. रवी भटकळ व  डॉ. विजय पटेल यांना अभिमान पुरस्काराने पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी नियामक मंडळाच्या पुस्तकाचे प्रकाशनही पाटील यांच्या हस्ते करण्यात  आले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j