तृतीय क्रमांक पटकावलेल्या ‘या’ खेळाडूंना मिळणार नाही नोकरीत आरक्षण

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण दिले जाते. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तर स्पर्धांमध्ये तृतीय क्रमांक देण्याच्या तरतूदी वेगवेगळ्या खेळांत भिन्न असल्याचे दिसून येते.

तृतीय क्रमांक पटकावलेल्या ‘या’ खेळाडूंना मिळणार नाही नोकरीत आरक्षण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी (Sports Reservation) पाच टक्के आरक्षणाच्या पात्रतेत राज्य सरकारने महत्वपूर्ण बदल केला आहे. ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, जागतिक क्रीडा स्पर्धा व एशियन चॅम्पियनशीप या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील (International Sport Copmpetition) ज्या खेळांमध्ये तृतीय क्रमांक दोन संघांना विभागून देण्याची तरतूद असेल, त्याच खेळाच्या राष्ट्रीय व राज्यस्तर स्पर्धेत विभागून दिलेल्या तृतीय क्रमांक धारक खेळाडू उमेदवारांना यापुढे आ आरक्षणाचा लाभ दिला जाणार आहे. (Reservation in Government Job)

 

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण दिले जाते. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तर स्पर्धांमध्ये तृतीय क्रमांक देण्याच्या तरतूदी वेगवेगळ्या खेळांत भिन्न असल्याचे दिसून येते. यामध्ये काही खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एकच तृतीय क्रमांक दिला जातो, तर त्याच खेळामध्ये राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर दोन तृतीय क्रमांक दिले जातात. त्यामुळे काही सांघिक खेळामध्ये सामाईकरित्या (विभागून) तृतीय क्रमांक दिलेल्या खेळाडूना ५ टक्के आरक्षणासाठी पात्र ठरविण्यात येत आहे.

मोठी बातमी : पुढील वर्षीपासून सर्व शाळांमध्ये ‘एक राज्य एक गणवेश’, शासन निर्णय जारी

 

काही सांघिक खेळात सामाईकरित्या तृतीय क्रमांक दिला जात नसल्याने हे खेळाडू आरक्षणासाठी पात्र ठरत नाहीत. तसेच केवळ खेळाडू आरक्षणाचे लाभ मिळवण्यासाठी सद्यस्थितीत काही राष्ट्रीय व राज्य क्रीडा संघटनांमार्फत त्यांच्यास्तरावर तृतीय क्रमांक सामाईकरित्या किंवा विभागून देण्याची कार्यवाही करीत असल्याचे शासनास आढळून आले आहे. ही बाब वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवून खेळाडू आरक्षणातून नोकरीसाठी स्पर्धा करणाऱ्या उमेदवारांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये तृतीय क्रमांक विभागून देण्यात येत असलेल्या संघातील खेळाडूंना आरक्षणाचे लाभ देणे विचाराधीन होते, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

यापुढे ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, जागतिक क्रीडा स्पर्धा व एशियन चॅम्पियनशीप या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील ज्या खेळांमध्ये तृतीय क्रमांक दोन संघांना विभागून देण्याची तरतूद असेल, त्याच खेळाच्या राष्ट्रीय व राज्यस्तर स्पर्धेत विभागून दिलेल्या तृतीय क्रमांक धारक खेळाडू उमेदवारांना ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे लाभ मिळणार आहेत. या तरतूदी व्यतिरीक्त इतर खेळ संघटनांमार्फत घोषित तृतीय क्रमांक धारक उमेदवारांना ५ टक्के  आरक्षणाचे लाभ दिले जाणार नाहीत, असे शासनाने स्पष्ट केले आहे. सर्व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तर क्रीडा स्पर्धांना हा निर्णय लागू होणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k