बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांची फेलोशिप परीक्षा रद्द ; सेट विभाग 10 जानेवारीला परीक्षा घेणार 

बार्टीने 2022 च्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांची फेलोशिप परीक्षा रद्द ;  सेट विभाग 10 जानेवारीला परीक्षा घेणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सारथी, महाज्योती (sarthi ,Mahajyoti) या संस्थेमधील 2022 या वर्षातील पीएचडीच्या विद्यार्थ्यांना (PhD students) सरसकट फेलोशिपचा लाभ देण्यात आला आहे. त्यानुसार बार्टीने (Barti) सुद्धा 2022 च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी आणि या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी चाळणी परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर बार्टीने 2022 च्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र, सर्व विद्यार्थ्यांची फेलोशिप परीक्षा रद्द (Canceled Fellowship Screening Examination) करण्यात आली, असा समज काही विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

बार्टी ,सारखी ,महाज्योती या शासकीय संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. परंतु, राज्य शासनाने सरसकट फेलोशिप न देता चाळणी परीक्षा घेऊन फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या माध्यमातून फेलोशिप परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेत गोंधळ झाल्याने परीक्षा रद्द करून येत्या १० जानेवारी रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.

महत्वाची अपडेट: कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ; नागरी सहकारी बँकेत इंटर्नशिपची संधी

दरम्यानच्या कालावधीत 2022 च्या पीएचडी नोंदणी धारक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, या मागणीसाठी 'बार्टी संशोधक विद्यार्थी कृती समिती - 2022' या विद्यार्थी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू करून बार्टी कार्यालयासमोर आंदोलन सुरू ठेवले. त्यावर सारथी व महाज्योती संस्थेने 2022 च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिपचा लाभ दिला आहे.बार्टीने सुद्धा 2022 च्या विद्यार्थ्यांना सरसकट लाभ द्यावा, असा पत्रव्यवहार बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांच्याकडे केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधक अधिछात्रवृत्ती २०२२ (BANRF -2022) साठी येत्या १० जानेवारी रोजी होणारी चाळणी परीक्षा रद्द करण्यात येत आहे, असे पत्रक सुनील वारे यांनी शनिवारी प्रसिद्ध केले.

हेही वाचा : प्रतीक्षा संपली विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला सुरूवात ; १ जानेवारीपासून करता येणार अर्ज

 बार्टीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार केवळ 2022 च्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इतर विद्यार्थ्यांची सुध्दा चाळणी परीक्षा रद्द करण्यात आली आहे,असा निर्णय किंवा परिपत्रक अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेच्या माध्यमातूनच फेलोशिप दिली जाणार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून 10 जानेवारी रोजी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच बार्टी, सारथी किंवा महाज्योती या संस्थांकडून अद्याप सेट विभागाला परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.
---------------
बार्टी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाबाबत सेट विभागाचे समन्वयक डॉ.बाळासाहेब कापडणीस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, येत्या 10 जानेवारी रोजी होणारी चाळणी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात बार्टी, सारथी किंवा महाज्योती या कोणत्याही संस्थेने सेट विभागाकडे अद्याप पत्रव्यवहार केलेला नाही. त्यामुळे सेट विभागाकडून प्रस्तावित परीक्षेचे नियोजन केले जात आहे.