NEET PG 2024 : परीक्षेच्या काही तास आधी तयार करणार प्रश्नपत्रिका

NEET PG परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षेच्या काही तास आधी प्रश्नपत्रिका तयार करण्यावर बैठकीत चर्चा झाली.

NEET PG 2024 : परीक्षेच्या काही तास आधी तयार करणार प्रश्नपत्रिका

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET UG आणि UGC NET पेपर लिक प्रकरणामुळे देशातील बर्‍याच महत्वाच्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे परीक्षा आयोजित करणार्‍या संस्था, शिक्षण मंत्रालय सावध पवित्रा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर NEET PG परीक्षेतही मोठा बदल अपेक्षित आहे. 

मीडिया रिपोर्ट नुसार, NEET PG परीक्षेसंदर्भात गृह मंत्रालयाच्या I4c विंगमध्ये आज एक मोठी बैठक पार पडली. परीक्षेची तारीख जाहीर होण्यापूर्वी ही बैठक महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. शिक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय,आरोग्य विभाग आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. NEET PG परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षेच्या काही तास आधी प्रश्नपत्रिका तयार करण्यावर बैठकीत चर्चा झाली. परीक्षा आयोजित करताना आणि परीक्षेच्या एकूणच प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे लूप होल्स असणार नाही याची खबरदारी घेण्यावर या बैठकीत चर्चा झाली. 

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) चे अध्यक्ष अभिजत शेठ यांनी सांगितले की, SOP आणि प्रोटोकॉलचे शक्य तितक्या लवकर पुनरावलोकन केले जाईल आणि पुढील आठवड्यापर्यंत परीक्षेची पुढील तारीख जाहीर केली जाईल. 

दरम्यान, NEET UG आणि UGC NET पेपर लीक झाल्यानंतर देशात अनेक मोठ्या परीक्षांवरही बंदी घालण्यात आली होती. 23 जून रोजी, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET PG 2024) देखील पुढे ढकलण्यात आली. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन लवकरच प्रवेश परीक्षेची नवीन तारीख जाहीर करणार आहे.