NEET UG : पेपर कसा फुटला; ‘त्या’ रात्री सेफ हाऊसमध्ये काय घडलं?

NEET UG परीक्षेच्या आधी काही उमेदवारांना बिहार राज्यातील पटना येथील शास्त्रीनगर मधील एका खोलीत (सेफ हाऊस) ठेवण्यात आले होते.

NEET UG  :  पेपर कसा फुटला;  ‘त्या’ रात्री सेफ हाऊसमध्ये काय घडलं?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अनेक नवे खुलासे होत आहेत. त्यातीलच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे NEET UG परीक्षेच्या आधी काही उमेदवारांना बिहार राज्यातील पटना येथील शास्त्रीनगर मधील एका खोलीत (सेफ हाऊस) ठेवण्यात आले होते. इथे त्यांच्याकडून  NEET UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.   

विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलेले सेफ हाऊस आशुतोष नावाच्या व्यक्तीच्या नावावर भाड्याने घेतले होते. आशुतोषने एका वाहिनीशी बोलताना हा खुलासा केला आहे. 4 आणि 5 मे च्या रात्री सेफ हाऊसमध्ये काय घडलं? याबाबत आशुतोषने सविस्तर माहिती दिली आहे.

आशुतोषच्या म्हणण्यानुसार, 4 मे रोजीच्या रात्री फक्त 5 ते 7 उमेदवार खोलीवर आले होते. मात्र, सकाळपर्यंत 15 जण तिथे पोहोचले होते. त्याचा मित्र मनीष एक दिवस आधीच काही मुलांना घेऊन तिथे आला होता. मनीषने आशुतोषला सांगितले की, "हे सर्व लोक माझ्या ओळखीचे आहेत, जे NEET चा पेपर द्यायला आले आहेत. रात्रभर इथे मुक्काम करतील आणि सकाळी निघून जातील." मी माझा भाऊ प्रभातला त्याच्याशी बोलायला सांगितले होते. पण त्याने तसे केले नाही. 4 मे रोजी रात्री 11 वाजता मनीष 5-7 जणांना घेऊन आला होता. सकाळी त्याच्या खोलीत 15 हून अधिक लोक उपस्थित होते. मनीषच्या हातात कागदाची फोटोकॉपी होती. प्रत्येकाच्या हातात प्रिंटआउट पेपर होता. यानंतर मनीष सर्वांना सोबत घेऊन मागच्या खोलीत गेला. आशुतोषच्या म्हणण्यानुसार, 5 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वजण येथून निघून गेले . विशेष म्हणजे त्याच दिवशी 2 वाजता NEET UG परीक्षा सुरू झाली होती.

त्याचदिवशी, आशुतोष जमशेदपूरला गेला होता. आशुतोष म्हणाला, "परत आल्यावर आम्हाला कळले की खोलीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. त्यानंतर मी माझा मोबाईल बंद केला.  पत्नीच्या फोनवरून प्रभातशी बोललो.  मी भाऊ प्रभातला फोन करून माझी चूक मान्य केली. मला माहीत असते तर मी मनीष आणि पोरांना इथे राहू दिले नसते." सेफ हाऊस प्रभात कुमार यांच्या पत्नी रेणू कुमारी यांच्या नावावर आहे. जे आशुतोषने दरमहा ५ हजार रुपये भाड्याने घेतले आहे.

दरम्यान, आर्थिक गुन्हे युनिटचे (EOU) उपमहानिरीक्षक (DIG) मानवजीत सिंग धिल्लन यांनी या विषयी माहिती देताना सांगितले होते की, त्यांना सेफ हाऊसमधून काही पुरावे सापडले आहेत. आतापर्यंत ६ पोस्ट-डेटेड चेक वसूल करण्यात आले आहेत. सेफ हाऊसमधून काही जळालेल्या प्रश्नपत्रिका सापडल्या आहेत. पेपरच्या बदल्यात प्रत्येक उमेदवाराकडून 30 लाख रुपये घेण्यात आले होते.