मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी ; या विद्यापीठाने घेतला निर्णय

विद्यार्थी मासिक पाळीमुळे एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज करू शकतात.परंतु, किमान 15 दिवस अभ्यासासाठी येण्याच्या अटीवरच ही रजा दिली जाईल.

मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी ; या विद्यापीठाने घेतला निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मासिक पाळी (menstruation)दरम्यान मुलींना होणार त्रास लक्षात घेत पंजाब विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. पाळी दरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी (student leave)देण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाने मंजुरी दिली असून असा निर्णय घेणारे पंजाब विद्यापीठ (Punjab University)हे उत्तर भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. 

विद्यापीठ प्रशासनाने सर्व विभागांना मासिक रजेबाबत परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकानुसार विद्यार्थिनींना या वर्षीच्या सत्रापासून म्हणजे 2024-25 पासून मासिक पाळी सुट्टी दिली जाईल. मात्र, या रजेसाठी विद्यापीठ प्रशासनाने काही अटीही ठेवल्या आहेत. या अंतर्गत रजा घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रथम विभागीय कार्यालयात उपलब्ध फॉर्म भरावा लागणार आहे. कॅलेंडरनुसार, विद्यार्थी मासिक पाळीमुळे एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज करू शकतात.परंतु, किमान 15 दिवस अभ्यासासाठी येण्याच्या अटीवरच ही रजा दिली जाईल. नियमानुसार प्रत्येक सेमिस्टरला चार दिवस सुट्टी दिली जाईल.

केरळमधील कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने जानेवारी 2023 मध्ये अशा पद्धतीची सुट्टी लागू केली होती. असे करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले होते.  आसामचे गुवाहाटी आणि तेजपूर युनिव्हर्सिटी,  हैदराबादमधील नलसर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ या मासिक पाळीच्या रजा मंजूर करणाऱ्या इतर संस्था आहेत.