ITI प्रवेशासाठी मुदतवाढ; 4 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

उमेदवारांना आता ३ जुलै सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. 

ITI प्रवेशासाठी मुदतवाढ; 4 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कौशल्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश (ITI Admission2024) प्रक्रिया सध्या सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार अर्ज सादर करण्याची मुदत संपली असून, आता ३ दिवसांची मुदतवाढ (3 days extension) देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना आता ३ जुलै सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. 

चार जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादीची प्रसिद्धी तर चार व पाच जुलैला गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे, अर्जातील माहितीत बदल करणे ही प्रक्रिया होणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प, प्राधान्य सादर करण्याची प्रक्रिया पाच जुलैला सुरू होणार असून सहा जुलैला सायंकाळी पाचपर्यंत ही प्रक्रिया होईल. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असून, एक लाख ५४ हजार ९३२ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीच्या, तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ६५२ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.