SET परीक्षेचा निकाल कुठे अडकला; सेट विभागाचे स्पष्टीकरण काय?  

विद्यापीठातील अधिकारी यांनी सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली.तसेच निकाल जाहीर करण्यासंदर्भात लवकर आदेश द्यावेत,याबाबत चर्चा केली.त्यामुळे येत्या आठवड्याभरात शासनाकडून आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे.

SET परीक्षेचा निकाल कुठे अडकला; सेट विभागाचे स्पष्टीकरण  काय?  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) सेट विभागातर्फे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल (SET EXAMINATION RESULT)राज्य शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे रखडला आहे.त्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर गोवा राज्यातील विद्यार्थी (Students from Maharashtra and Goa)सुध्दा निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.त्यावर विद्यापीठ प्रशासनातर्फे (University Administration)येत्या गुरूवारी किंवा शुक्रवारी प्रसिध्दी पत्रक प्रसिध्द करून माहिती जाहीर केली जाणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान,राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यांशी न खेळता निकाल जाहीर करण्यास परवानगी द्यावी,असही मागणी युवासेनेचे (उठाबा )सह - सचिव कल्पेश यादव(Joint Secretary Kalpesh Yadav)यांनी केली असून राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे.

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे 7 एप्रिल रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यातील तब्बल एक लाखाहून अधिक उमेदवारांची परीक्षा घेतली. मात्र दोन महिन्यांचा कालावधी होत आला तरीही अद्याप सेट विभागाने निकाल जाहीर केला नाही.राज्य शासनाकडून परीक्षेचा निकाल मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करून जाहीर करावा की पारंपरिक पद्धतीने पूर्वीप्रमाणे जाहीर करावा, याबाबत सेट विभागाला निर्देश प्राप्त झालेले नाहीत.त्यामुळे निकाल रखडलेला आहे. यंदा परीक्षेसाठी 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 1 लाख 9 हजार 154 विद्यार्थी परीक्षेस उपस्थिती होते.उपस्थितीची आकडेवारी विचारात घेता 85.11 टक्के विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते.हे सर्व विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

SET परीक्षेचा निकाल एसईबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतरच ; सेट विभागाचे जाहीर प्रकटन

सेट विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाला व सामान्य प्रशासन विभागाला निकाल जाहीर करण्यासंदर्भात सुमारे दीड महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.सेट परीक्षेचा निकाल मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करून जाहीर करण्यात यावा किंवा प्रचलित पद्धतीने जाहीर करण्यात यावा, याबाबत सेट विभागाने शासनाकडे अभिप्राय मागितला आहे. परंतु, शिक्षण विभागाकडून अद्याप या संदर्भातील उत्तर प्राप्त झाले नाही. आता या संदर्भातील पत्र सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आले आहे.सेट विभागाकडून परीक्षेचा निकाल तयार करण्यात आला आहे.मात्र, केवळ शासनाकडून कोणताही अभिप्राय प्राप्त होत नसल्याने निकाल जाहीर करण्यात अडचणी येत आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे घेतली जाणारे नेट परीक्षा पेपर फुटीच्या कारणामुळे रद्द करावे लागले.त्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील तरुणांचे मोठे नुकसान झाले. गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती रखडलेले आहे. काही महाविद्यालयांमधील प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी जाहिरात देऊन मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करता येऊ शकतो. परंतु, निकाल लांबल्यामुळे या उमेदवारांचे भवितव्य अंधारात जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी सेट विभागाला तात्काळ अभिप्राय कळवावा,अशी मागणी कल्पेश यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

-----------------------------

विद्यापीठातर्फे राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.बुधवारी (दि.3 जून)विद्यापीठातील अधिकारी यांनी सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली.तसेच निकाल जाहीर करण्यासंदर्भात लवकर आदेश द्यावेत,याबाबत चर्चा केली.त्यामुळे येत्या आठवड्याभरात शासनाकडून आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस सेट परीक्षेच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.