कसबा पोट निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने...
आपला परंपरागत मतदार संघ भारतीय जनता पक्ष राखणार की काँग्रेस कसब्यात सुरुंग लावणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.गुरूवारी दुपारपर्यंत मतमोजणीतून मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होईल.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून गुरुवारी (दि.२) कोणाच्या बाजूने मतदार राजाने मताचे दान केले हे स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत झाली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.
माजी महापौर व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी व विरोधकांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठित केली. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते कसबा पेठेत मुक्काम ठोकून होते. तसेच रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सुद्धा केवळ काँग्रेसच्याच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेऊन मतदार संघात रॅली काढली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते अजित पवार , आमदार आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी धंगेकर यांचा जोरदार प्रचार केला.तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट रासने यांच्या प्रचारात उतरले. सुरूवातीला टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेली पोट निवडणूक राज्याच्या विकासाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचली.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक एकूण ५०.०६ टक्के मतदान झाले. त्यानंतर पुण्यात एकच चर्चा रंगली कसब्याचा भावी आमदार कोण ? दोन दिवसांपासून दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी त्यांचाच नेता विजयी होणार असल्याचे बॅनर्स लावले आहेत. मात्र कोणत्याही प्रभागातून मतांची आघाडी कोणत्या उमेदवाराला मिळते त्यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
आपला परंपरागत मतदार संघ भारतीय जनता पक्ष राखणार की काँग्रेस कसब्यात सुरुंग लावणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.गुरूवारी दुपारपर्यंत मतमोजणीतून मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होईल.