ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेशांचे वाटप होईल; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही 

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा कार्यक्रम आणि राज्य योजनेतून दोन मोफत गणवेश देण्यात येत आहेत.

ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेशांचे वाटप होईल; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश (School uniform) कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर त्याला आता पुर्णविराम मिळाला आहे.  येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेशांचे वाटप पूर्ण केले जाईल (All students will get uniform by August), अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखीन किमान दीड महिना गणवेशाविना काढावा लागणार आहे. 

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा कार्यक्रम आणि राज्य योजनेतून दोन मोफत गणवेश देण्यात येत आहेत. या गणवेशाचा दर्जा आणि रंग समान असावेत म्हणून राज्यात 'एक राज्य, एक गणवेश' योजना चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. त्यासाठी शासनाच्या खरेदी धोरणानुसार निविदा प्रक्रिया राबवून कापड पुरवठा सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गणवेश किती चांगले दिले जात आहेत, हे सांगताना त्यांनी दोन गणवेश सभागृहात दाखविले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , दोन गणवेशांपैकी एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शिलाई करून देण्यात येणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्काऊट गाईड्सच्या गणवेशाचे कापड शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात येत आहेत. शालेय शिक्षण विभागाने गणवेशाच्या कापड खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. ऑगस्टपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, असेही त्यांनी सांगितले.