पुणे विद्यापीठात हेल्मेट सक्ती ? 

सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात विना हेल्मेट दुचाकी चालवणा-यावर कारवाई होणार असल्याचे सूचित केले आहे.त्यामुळे विद्यापीठ आवारात वाहतूक पोलिसांकडून होणा-या हेल्मेट विरोधी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

पुणे विद्यापीठात हेल्मेट सक्ती ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
 शासकीय नियमांचे पालन करणे हे शासकीय अधिकारी, कर्मचारी (government officers, employees) यांचे आद्य कर्तव्य आहे. जनतेस मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने तसेच स्वत:च्या व सहप्रवाशांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीने अधिकारी व कर्माचा-यांनी कार्यालयात येताना-जाताना अथवा कामासाठी दुचाकीवरून बाहेर पडताना हेल्मेट वापरणे आवश्यक (helmet compulsory- two wheeler bike) आहे. हेल्मेट न वापरल्यास संबंधित व्यक्ती मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरतो, असे परिपत्रक प्रसिध्द करून एकप्रकारे सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रशासनाने (Savitribai Phule Pune University Administration) विद्यापीठात विना हेल्मेट दुचाकी चालवणा-यावर कारवाई होणार असल्याचे सूचित केले आहे.त्यामुळे पुढील काळात विद्यापीठ आवारात सुध्दा वाहतूक पोलिसांकडून होणा-या हेल्मेट विरोधी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

हेही वाचा : शिक्षण NEP 2020 : विद्या परिषदेच्या नियुक्त्या रद्द झाल्याने अंमलबजावणीत अडचणी; सुकाणू समिती अध्यक्षांची नाराजी
 
 सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे , महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणा-या कर्मचारी व अधिकारी यांनी दुचाकी वापरताना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधित मोटर अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरतात. त्याचाप्रमाणे मोटर अधिनियम कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांची गंभीर नोंद घेतली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयातर्फे काढण्यात आले आहेत.
 काही महिन्यांपूर्वी विद्यापीठ आवारात वाहतूक विभागाने हेल्मेट विरोधी कारवाई केली होती. त्यावर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेत तिव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.मात्र, विद्यापीठ आवार ही खासगी मालमत्ता नाही.त्यामुळे विद्यापीठात हेल्मेट न वापरणा-यावर कारवाई होऊ शकते.हेच विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 



विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संबंधित सर्व अधिकारी , कर्मचारी , विद्यार्थी, विद्यार्थीनी व नागरिक यांनी विद्यापीठ आवारात दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा,असे आवाहन केले आहे. तसेच हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधित व्यक्ती मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र होईल,असे स्पष्ट केले आहे. 
-----------------------------------------
 रास्ता सुरक्षेचा विषय सर्वांसाठी महत्वाचा असून सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.अन्यथा विद्यापीठ आवारात देखील सक्षम अधिका-यांकडून दंडात्मक कारवाई होऊ शकते. 
- डॉ. प्रफुल्ल पवार , कुलसचिव , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ