शेती विकून आई-वडिलांनी सिमरनला बनवले मर्चंट नेव्ही ऑफिसर; एक प्रेरणादायी प्रवास

समुद्राच्या लाटांवर स्वार होणारी पुणे जिल्ह्यातील पहिला महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर होण्याचा बहुमान मिळवला.  

शेती विकून आई-वडिलांनी सिमरनला बनवले मर्चंट नेव्ही ऑफिसर; एक  प्रेरणादायी प्रवास

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मनात ध्येय, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येते. त्याचा प्रत्येय इंदापूरच्या सिमरन थोरात (Simran Thorat) हिचा प्रेरणादायी प्रवास ऐकल्यावर नक्की आल्याशिवाय राहणार नाही. स्वतः बरोबर आई-वडीलांचे स्वप्न साकार करायचे असेल तर अनेक गोष्टींवर पांघरुन घालून, मन मारून पुढे जावे लागते. आई-वडीलांनी अपार कष्ट करुन सिमरनला शिकवले, तिने देखील रात्रीचा दिवस एक करून त्यांच्या कष्टाचं सोनं केलं आणि समुद्राच्या लाटांवर स्वार होणारी पुणे जिल्ह्यातील पहिली (First in Pune district) महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर (Merchant Navy Officer) होण्याचा बहुमान मिळवला.  

इंदापूर तालुक्यातील एक छोट्याशा गावातील सिमरनने लहानपणीच समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पुर्ण करुन दाखवले. मात्र, हे समजावे तेवढे अजिबात सोपे नव्हते. मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचे आणि तेही एका महिलेने हे खुप आव्हानात्मक होते. घरची परिस्थिती बेताची होती, आणि या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो. त्यासाठी तीन वर्षाचा कोर्स आहे. त्याचे निव्वळ शुल्क ९ लाखाच्या पुढे आहे. इतर गोष्टींचा तर हिशोब करणेच उचित ठरणार नाही. अल्पभूधारक असलेल्या सिमरनच्या वडिलांनी मुलीच्या स्वप्नापाई होती नव्हती तेवढी शेती विकून टाकली. त्याानंतर आईने एका फॅक्टरीत तर वडिलानी  इलेक्ट्रशियनचे काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाय केला आणि मुलीला लागेल तेव्हा, लागेल तेवढा पैसा पुरवला. तिने देखील या सर्व गोष्टींची जाण ठेवून पुणे जिल्ह्यातील पहिली महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर होण्याचा मान मिळवला. 

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिमरन सांगते की, आर्थिक-सामाजिक अडथळे दूर केल्यानंतर शिक्षणामध्ये काही, भाषेशी संबंधित अडचणी आल्या. प्राथमिक शिक्षण केवळ मराठी माध्यम आणि त्यानंतर सेमी इंग्रजीत झाल्यामुळे मर्चंट नेव्हीचा इंग्रजी भाषेत असलेला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे तसे आव्हानच होते. तरीही सिमरनने मेहनत करत हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतरच्या घटना सांगताना सिमरन म्हणाली, मी माझ्या बॅचमधील इतर मुलींप्रमाणेच चांगली विद्यार्थीनी होते, पण सुरुवातीच्या प्लेसमेंट फेरीत मला नाकारण्यात आले. माझे इंग्रजी अस्खलित नसल्यामुळे मला एका मोठ्या शिपिंग कंपनीतील नोकरी नाकारली गेली. मी निराश झाले, पण त्यातूनही स्वतःला सावरत आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला. मी भावाशी फोनवर इंग्रजीत बोलू लागले. आरशासमोर तासनतास इंग्रजी बोलण्याचा सराव केला. अखेरच्या वर्षात सीस्पॅन कंपनी जेव्हा प्लेसमेंटसाठी आली, तेव्हा त्यांनी माझी महिला डेक कॅडेट म्हणून निवड केली. याआधी सीस्पॅन कंपनीत एकाही महिलेने काम केलेले नाही.