ब्लॉकचेन तंत्रज्ञान तरुण पिढीसाठी करिअरचा योग्य पर्याय : डॉ. आदित्य अभ्यंकर

शिक्षण आणि कौशल्य याची योग्य सांगड घालून यशस्वी करिअर करता येते. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना पुढील २५ वर्षांचा विचार करावा.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान तरुण पिढीसाठी करिअरचा योग्य पर्याय : डॉ. आदित्य अभ्यंकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ब्लॉकचेन तंत्रज्ञान  (Blockchain technology) हे फक्त आर्थिक क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नसून खासगी, सरकारी अशा सर्वच क्षेत्रात डेटा सिक्युरिटीसाठी ब्लॉकचेनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येणारे युग हे डेटा सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहे म्हणून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची गरज दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यामुळेच ब्लॉकचेन तंत्रज्ञान तरुण पिढीसाठी करिअरचा योग्य पर्याय आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी (Dr. Aditya Abhyankar) केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागात ‘सध्याच्या युगात नविन तंत्रज्ञानाच्या वाढत्या संधी' या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पॅलाडियम लॅब अँड रिवेरा मनीचे सहसंस्थापक अक्षय सिन्हा, पुणे डिएओ अँड कम्युनिटी बिल्डरच्या संस्थापिका अलमास सय्यद आणि बीडीए सोलिडस एआय टेक ॲन्ड क्रिप्टो डिजेचे संस्थापक ऋषी वहदाने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

शिक्षण आणि कौशल्य याची योग्य सांगड घालून यशस्वी करिअर करता येते. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना पुढील २५ वर्षांचा विचार करावा. यापुढील काळात ब्लॉकचेन तंत्रज्ञान सर्वच क्षेत्राचा प्रमुख भाग झालेले असेल. भविष्यातील ही गरज ओळखूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बी.एस्सी इन ब्लॉकचेन टेक्नोलॉजी या पदवी अभ्यासक्रमाला या वर्षापासून सुरूवात करण्यात आल्याची माहिती डॉ. अभ्यंकर यांनी दिली. तसेच रोजगाराच्या नविन संधीचा विचार करून विद्यार्थी आणि पालकांनी या अभ्यासक्रमाचा प्राधान्याने विचार करावा,असे आवाहनही अभ्यंकर यांनी यावेळी केले.