शिक्षण हा देशाच्या अस्तित्वाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू : अन्नपूर्णा देवी

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने शिक्षणाचे राष्ट्रीय निर्मितीमध्ये असणारे योगदान याचा विचार करायला हवा.

शिक्षण हा देशाच्या अस्तित्वाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू : अन्नपूर्णा देवी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

"शिक्षण हा केवळ राष्ट्राच्या विकासाचा नाही तर अस्तित्वाचा महत्त्वपूर्ण असा केंद्रबिंदू आहे. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी अपार परिश्रम घेतले.आपण सर्वांनी सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानून देशाची नवी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत " असे मत केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पुण्यात व्यक्त केले.

मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावरील दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अन्नपूर्णा देवी बोलत होत्या. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री‌ दिपक केसरकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, शिक्षण विषयावरील चित्रपट निर्माते व शिक्षणतज्ज्ञ चंद्रप्रकाश द्विवेदी आदी उपस्थित होते.

अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने शिक्षणाचे राष्ट्रीय निर्मितीमध्ये असणारे योगदान याचा विचार करायला हवा. कोणतेही राष्ट्र हे तेथील लोकांमुळे बनते. त्यामुळे जनतेचे सक्षमीकरण करण्यासाठी केवळ आर्थिक नाही तर शिक्षणाला सुद्धा महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्वच क्षेत्रात बदल होत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातही आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी काय शिकावे त्या बरोबरच त्यांनी कसे शिकले पाहिजे, याचे सुद्धा ज्ञान त्यांना द्यायला हवे.

दिपक केसरकर म्हणाले, रशिया, फ्रान्स, जर्मनी ,यासारख्या देशांनी इंग्रजी ऐवजी आपल्या देशातील भाषांना प्राधान्य दिले. तरीही हे देश औद्योगिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. इंग्रजी हे केवळ संभाषणाची भाषा आहे. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिल्याने त्यांना संबंधित विषयातील संकल्पना लवकर समजतात. नवीन शैक्षणिक धोरणात व्होकेशनल ट्रेनिंगचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होतील. आता केवळ भारताचा विचार करून चालणार नाही तर जगाचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागेल.

 चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. सर्वस्वयत्तम महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यापीठांमध्ये प्र- कुलगुरू व अधिष्ठाता यांची नुकतीच शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाकडून शालेय व उच्च शिक्षण स्तरावर यांनी तिच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. जी २० च्या निमित्ताने पुणे विद्यापीठात विविध राज्यांनी शैक्षणिक स्टॉलचे प्रदर्शन भरवले आहे.या प्रदर्शनाला अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी भेट द्यावी.

---------------

विद्यार्थी शाळेत जेवढा वेळ घालवत नाहीत तेवढा वेळ टीव्ही पाहण्यात आणि सोशल मीडियावर घालवतात. व्हाट्स ॲप युनिव्हर्सिटीमधून बरेच ज्ञान ते घेत असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिस्त लागणे गरजेचे आहे.याचाही विचार आपण सर्वांनी करायला हवा.

- चंद्रप्रकाश द्विवेदी,शिक्षणतज्ज्ञ,