वाबळेवाडी शाळा प्रकरण : आमदार अशोक पवार यांना गावबंदी, गावकऱ्यांनी घेतला निर्णय

वाबळेवाडी शाळेतील गैरप्रकार दोन-अडीच वर्षांपुर्वी झाला, त्याची चौकशी कालबध्द पध्दतीने करण्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत केली.

वाबळेवाडी शाळा प्रकरण : आमदार अशोक पवार यांना गावबंदी, गावकऱ्यांनी घेतला निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिरुर तालुक्यातील शिक्रापूर-वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेची (Wablewadi School) चुकीची माहिती विधानसभेत (Maharashtra Assembly) देवून आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांनी शाळेची बेअब्रु केली असल्याचा आरोप शिक्रापूरच्या वाबळेवाडी ग्रामस्थांनी केला आहे. तसेच विशेष ग्रामसभा व पालकसभा घेवून त्यांच्या गावबंदीचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच यापुढे वाबळेवाडीबद्द्ल आक्षेपार्ह बोलू नये,असा इशारा गावातील संतप्त महिलांनी दिला.

वाबळेवाडी शाळेतील गैरप्रकार दोन-अडीच वर्षांपुर्वी झाला, त्याची चौकशी कालबध्द पध्दतीने करण्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर उत्तर देताना म्हणाले, एकेकाळी वाबळेवाडी शाळा ही जिल्हा परिषदेची आयडीयल शाळा म्हणून नावाजली. या शाळेला अनेक पुरस्कार मिळाले.येथे डिजिटल क्लासरुम झाल्या.नवीन उपक्रम सुरू झाले.जिल्हा परिषदेची शाळा अशीही असू शकते,याची चर्चा झाली. या शाळेबाबत काही तक्रारी झाल्या असतील तर कालबध्द चौकशी करण्याचे आदेश दिले जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

वाबळेवाडी शाळा चौकशीच्या फेऱ्यात? आमदार पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचे आश्वासन

मात्र, त्यावर वाबळेवाडीतील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. शुक्रवारी तातडीने ग्रामसभा व पालकसभा घेतली. तसेच आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत शाळेचा प्रश्न चुकीच्या पध्दतीने मांडल्याचा निषेध केला. तसेच यापुढे वाबळेवाडी प्रकरणी पुन्हा बोलाल तर पुणे नगर महामार्गावर त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला.

राज्याच्या विधानसभा अधिवेशनात आमदार अशोक पवार यांनी वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत सर्रास २५ हजार प्रवेश फी घेवून प्रवेश दिले जातात. मुख्याध्यापकांसह बाहेरील दोन व्यक्ती हे पैसे स्विकारतात. या शिवाय सीएसआर मार्फत होणा-या कामाच्या फंडाचा हिशोब जिल्हा परिषदेला दिला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय वाबळेवाडीची दहा वीस मुले शाळेत असून उर्वरित मुले धनदांडग्यांची आहेत, असे ते म्हणाले. परंतु, ही सर्व माहिती दिशाभूल करणारी व शाळेची अब्रु काढणारी आहे. त्यामुळे पालकांनी व ग्रामस्थांनी आमदार पवार यांचा निषेध केला.

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्वाचा बदल

कधीही शाळेला मदत न करता केवळ शाळेची बदनामी करता, आधी घोडगंगा कारखान्याच्या कामगारांचे पगार द्या मगच बोला, एका कंत्राटदाराला तक्रारदार म्हणून उभे करुन त्याच्या मार्फत शाळेला आमदारांनी बदनाम केले, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वाबळे, मल्हारी वाबळे, सतीश वाबळे, आबा वाबळे, निलेश दिघे, मीनाक्षी चौधरी, सखुबाई वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, बापू वाबळे, निवृत्ती वाबळे, सतीश कोठावळे, सुरेखा वाबळे, माजी सरपंच केशवराव वाबळे, डॉ.गणेश वाबळे, नानासाहेब वाबळे,  कृष्णा सासवडे, कुंडलिक वाबळे, रेश्मा वाबळे, मल्हारी वाबळे, ताराबाई वाबळे आदी उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD