Medical Admission : पहिल्या टप्प्यात केवळ एमबीबीएस, बीडीएसचेच प्रवेश...नोंदणीसाठी उरले काही तास, 'आयुष'साठी पाहा वाट

वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. सीईटी सेलकडून प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

Medical Admission : पहिल्या टप्प्यात केवळ एमबीबीएस, बीडीएसचेच प्रवेश...नोंदणीसाठी उरले काही तास, 'आयुष'साठी पाहा वाट
MBBS, BDS Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात सीईटी सेलकडून (State CET Cell) वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची (Medical Education) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात केवळ एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएस (BDS) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. त्यानुसार एमबीबीएस आणि बीडीएसची पहिली अंतिम निवड यादी ४ ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेत नोंदणीसाठी आता केवळ काही तासांचाच कालावधी उरला आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. सीईटी सेलकडून प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या आदल्यादिवशीपर्यंत सीईटी सेलकडून माहितीपुस्तिका प्रसिध्द करण्यात आली नव्हती. विविध हमीपत्रांचा नमुनाही उपलब्ध नव्हता. सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे सीईटी सेलला ३१ जुलैपर्यंत नोंदणीची मुदत वाढवावी लागली.

NEET UG Counselling 2023 : पहिल्या फेरीची अंतिम निवड यादी जाहीर, उद्यापासून घ्या प्रत्यक्ष प्रवेश

सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार, ३१ तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. एमबीबीएस व बीडीएससह आयुष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थीही नोंदणी करू शकतात. ३१ तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत नोंदणी फी भरता येईल. तर सायंकाळी पाचवाजेपर्यंत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. याचदिवशी एमबीबीएस व बीडीएस प्रवेशाच्या संस्थानिहाय जागांची माहिती प्रसिध्द केली जाईल.

विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर १ ऑगस्टला एमबीबीएस व बीडीएससाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर १ ते ३ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंतीक्रम भरता येतील. त्याआधारे ४ ऑगस्ट रोजी एमबीबीएस व बीडीएसची पहिली निवड यादी जाहीर केली जाईल. या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना ५ ते ९ ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

धक्कादायक : केंद्रीय शिक्षण संस्थांमधील २० विद्यार्थी दरवर्षी करतात आत्महत्या

आयुष अभ्यासक्रमांसाठी ४ ते ९ ऑगस्टदरम्यान नोंदणी

बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी आणि बी (पी अँन्ड ओ) या अभ्यासक्रमांसाठी ४ ते ९ ऑगस्टदरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही. या कालावधीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा एमबीबीएस व बीडीएस प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. या अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी १३ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD