विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्वाचा बदल

राज्यात सध्या सीईटी सेलमार्फत कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून ३१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्वाचा बदल
Agriculture Admission Procees

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Agriculture Admission : राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या (Engineering) व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, हा बदल नेमका कोणत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

राज्यात सध्या सीईटी सेलमार्फत कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून ३१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. नोंदणी करतानाच विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयनुसार पसंतीक्रम भरून घेण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक फेरीसाठी निवड यादी प्रसिध्द केली जाते. तर अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरता येतात. आता ही पध्दत कृषी अभ्यासक्रमांसाठीही राबविली जाणार आहे.

11th Admission : अतिवृष्टीमुळे विशेष फेरीतील प्रवेशासाठी मुदतवाढ

राज्य सरकारच्या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत. कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होईल तसेच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणे शक्य होईल, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून दिली.

कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीभूत पद्धतीने राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. कृषी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असलेल्या महाविद्यालये किंवा संस्थांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापण्यास परवानगी देण्यासंदर्भातही बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. राज्यातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, रोपवाटीका आदींच्या प्रश्नांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह धनंजय मुंडे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शेखर निकम, वित्त, सामान्य प्रशासन, नियोजन, उच्च व तंत्रशिक्षण तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू (व्हीसीद्वारे) उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD