अखेर खाशाबा जाधव क्रीडा संकुल विद्यार्थ्यांसाठी खुले
विद्यापीठातील क्रीडा स्पर्धांबरोबर, महाविद्यालयीन, शालेय क्रीडा स्पर्धांसाठी देखील हे क्रीडा संकुल खुले होईल, असे वर्षभरापुर्वी सांगण्यात आले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आवारात नव्याने साकारण्यात आलेले खाशाबा जाधव क्रीडा संकुल (Khashaba Jadhav Sports Complex) सोमवारी महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra day) औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. जवळपास वर्षभरापूर्वी या संकुलाचे ‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल’ असे नामकरण आणि पै. खाशाबा जाधव व स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर (Union Minister Khashaba Jadhav) यांच्या हस्ते करण्यात आले होते.
जवळपास २७ एकरात उभारण्यात आलेले खाशाबा जाधव क्रीडा संकुल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे पासून विद्यार्थ्यांना खुले करण्यात आले आहे. यासाठीची नियमावली तयार करण्यात आली असून विद्यापीठातील तसेच विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी काही नियम व अटींच्या अधीन राहून या संकुलाचा लाभ घेऊ शकतात. अथलेटिक ट्रॅक, टेबल टेनिस कोर्ट, बॅडमिंटन, इनडोअर स्पोर्ट्स हॉल मधील इतर खेळ आदींचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.
हेही वाचा : ॲम्बी व्हॅलीत शिक्षण विभागाची कार्यशाळा की इव्हेंट मॅनेजमेंट शो?
विद्यापीठातील हे भव्य क्रीडा संकुल तब्बल २७ एकर परिसरात साकारण्यात आले आहे. विद्यापीठातील क्रीडा स्पर्धांबरोबर, महाविद्यालयीन, शालेय क्रीडा स्पर्धांसाठी देखील हे क्रीडा संकुल खुले होईल, असे वर्षभरापुर्वी सांगण्यात आले होते. मात्र, त्यासाठी त्यासाठी नियमावली आणि ध्येय धोरणांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार होता. विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी वर्षभराचा कालावधी घेतला. अखेर सोमवारी संकुल खुले करण्याचा मुहूर्त साधण्यात आला.
खाशाबा जाधव क्रीडा संकुला’चे वैशिष्ट्ये -
- सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, अस्ट्रो टर्फ लॉन टेनिस कोर्ट
- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शूटिंग रेज
- अद्ययावत व्यायामशाळा
- खो-खो, कबड्डी, कॉर्फ बॉल, हॅण्डबॉल असे मैदानी खेळाचे क्रीडांगण
- बहुउद्देशीय इनडोअर हॉल
- बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, ज्यूदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस
- कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स असे विविध क्रीडा प्रकार खेळता येणार