पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला घरघर; विद्यार्थ्यांना पदवीनंतरच हवी नोकरी

गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठात प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.काही कला शाखेच्या विभागांमध्ये प्रवेश क्षमतेएवढे विद्यार्थी सुद्धा प्रवेशासाठी अर्ज करत नसल्याची माहिती समोर आली आहे.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला घरघर; विद्यार्थ्यांना पदवीनंतरच हवी नोकरी
SPPU PG Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) विविध विभागांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास (PG Courses) प्रवेश घेण्यासाठी हजारो व शेकडोंच्या संख्येने येणारे अर्ज आता चांगलेच कमी झाले आहेत. तसेच संलग्न महाविद्यालयांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी सुद्धा घटले आहेत. त्यातच अलिकडे विद्यार्थी (Students) व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास पसंती देत आहेत. त्यामुळे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला घरघर लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Savitribai Phule Pune University News)

पुणे विद्यापीठातील विभागांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी केवळ पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी प्रयत्न करत होते. परंत, गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठात प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.काही कला शाखेच्या विभागांमध्ये प्रवेश क्षमतेएवढे विद्यार्थी सुद्धा प्रवेशासाठी अर्ज करत नसल्याची माहिती समोर आली आहे.अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठात वसतिगृह उपलब्ध होत नाही. पुण्यासारख्या शहरात राहण्याचा खर्च अनेकांना परवडत नाही. त्यातच गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातील अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत. रिक्त झालेल्या प्राध्यापकांच्या जागा भरल्या गेल्या नाहीत, अशा अनेक कारणांमुळे विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचा ओढा काहीसा कमी झाला आहे.

SPPU News : ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’साठी सरकार तिजोरी उघडणार का?

पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये खाजगी विद्यापीठांचे जाळे पसरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन रोजगाराभिमुख व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. विद्यापीठाशी संलग्न काही महाविद्यालयांमध्ये सुद्धा बोटावर मोजता येतील एवढेच विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे.

पदवी अभ्यासक्रमानंतर तात्काळ नोकरी मिळवून पैसे कमावण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. तसेच दूर शिक्षण पद्धतीने विविध विद्यापीठांमधून एम.ए., एम. कॉम. आदी अभ्यासक्रम पूर्ण करता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना नियमितपणे प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या 
कमी झाली आहे. 

अभियांत्रिकी पदविकेतील नापास विद्यार्थ्यांना मिळणार संधी! चंद्रकांत पाटील यांची घोषणा

महाविद्यालयांमध्येही संख्या घटली

पारंपरिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरी मिळत नाही. तसेच अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये चांगलाच बदल झाला आहे. पदवी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरी हवी आहे. विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देणे शक्य नाही. महाविद्यालयांमध्ये सुद्धा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर त्यात बदल झालेला दिसेल.

- डॉ. एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo