कसब्यात काँग्रेसने उधळला गुलाल ;महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा विजय

कसब्याच्या परंपरागत मतदारांनी भाजपची साथ सोडण्याचे दिसून येत आहे. तब्बल ११ हजाराहून अधिक मतांनी धंगेकर यांनी रासने यांना पराभूत केले.

कसब्यात काँग्रेसने उधळला गुलाल ;महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा विजय

कसबा पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. भाजपाचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसब्याला सुरुंग लावत विजयाची माळ गंगेकर यांनी आपल्या गळ्यात घातली आहे. कसब्याच्या परंपरागत मतदारांनी भाजपची साथ सोडण्याचे दिसून येत आहे. तब्बल ११ हजाराहून अधिक मतांनी धंगेकर यांनी रासने यांना पराभूत केले.

     कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनानंतर कसब्याच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रवींद्र धंगेकर कसबा मतदारसंघात काम करत होते. गिरीश बापट यांनी अनेक वर्ष या मतदारसंघावर आपली छाप कायम ठेवली होती.परंतु, तीन दशकांपासून अधिक कालावधी पर्यंत भाजपच्या बाजूने झुकलेला मतदार यावेळी मात्र काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले.

     टिळक कुटुंबीयातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी , यापासून निवडणुकीबाबत नाराजीचा सूर लागला होता. केवळ स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढली गेली नाही तर विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली. भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची केलेली निवडणूक त्यांच्या हातून निसटली. त्यामुळे भाजपला मोठे आत्मचिंतन करावे लागणार आहे.