अनुभवासह 'या' गोष्टी ठरवणार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू? आजपासून मुलाखतींना सुरूवात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर (Nitin Karmalkar) यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेले कुलगुरू पद भरण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अनुभवासह 'या' गोष्टी ठरवणार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू?  आजपासून मुलाखतींना सुरूवात
SPPU Vice Chancellor

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून गुरुवारी (दि.१८) व शुक्रवारी (दि.१९) कुलगुरू (Vice Chancellor) पदासाठी अर्ज केलेल्या २७ उमेदवारांची मुलाखत (Interview) घेतली जाणार आहे. त्यातून पाच उमेदवारांची नावे निवडून राज्यपालांकडे (Governor) पाठवली जातील. या पाच उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर साधारणपणे मे महिना अखेरीस किंवा जून महिन्यात विद्यापीठाला (Pune University) नवीन कुलगुरू मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर (Nitin Karmalkar) यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेले कुलगुरू पद भरण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे विद्यापीठातीलच सध्या कार्यरत असलेल्या ११ जणांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला आहे. विद्यापीठातील काही उमेदवारांच्या मुलाखती १८ मे रोजी असून उर्वरित उमेदवार १९ मे रोजी मुलाखतीला जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : पीएचडी, नेट नसतानाही प्राध्यापक; मंजूर पदांचे काय होणार? 'यूजीसी'चे नवे पोर्टल सुरू

कुलगुरू पदाच्या पात्रतेचे निकष उपलब्ध आहेत. प्राध्यापक म्हणून दहा वर्षे काम केलेल्या व्यक्तीला कुलगुरू पदासाठी अर्ज करता येतो. परंतु, संबंधित उमेदवाराचा शैक्षणिक व प्रशासकीय अनुभव तपासला जातो. उमेदवाराने आत्तापर्यंत कोठे काय काय केले आहे?  हे पाहिले जाते. वेब ऑफ सायन्स वरील व गुगल स्कॉलर साईटेशन, एच इंडेक्स, पब्लिकेशन्स आदी माहिती सुद्धा लक्षात घेतली जाते. उमेदवाराच्या नावे असणारे पेटेन्ट, विद्यापीठांच्या अधिकार मंडळावर केलेल्या कामाचा अनुभव, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विशेष उपक्रम, रिसर्च प्रोजेक्ट, उमेदवाराचा सोशल अवेअरनेस आदी गोष्टी मुलाखती दरम्यान पाहिल्या जातात, असे या पूर्वी कुलगुरू पदाची मुलाखत दिलेल्या एका उमेदवाराने सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांच्यासह माजी अधिष्ठाता अंजली कुरणे, विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. संदेश जाडकर, भौतिकशास्त्र विभागातील प्रा. संजय ढोले, पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. सुरेश गोसावी, गणित विभागाचे विलास खरात, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे राजू गच्छे यांचा विद्यापीठातील इच्छूकांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा : पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी खास 'ॲप', थेट ऑनलाईन संवाद साधता येणार

जळगाव विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख अशोक महाजन, जळगाव विद्यापीठातील बी. वी. पवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील दीपक पानसकर, मुंबई विद्यापीठातील डॉली सनी, मुंबई विद्यापीठाच्या डिस्टन्स अँड ओपन लर्निंग विभागाचे संचालक पी. ए. महानवर, कोल्हापूर विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागातील प्रा. संजय चव्हाण, कोल्हापूर विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता श्रीकृष्ण महाजन, शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे विजय फुलारी, औरंगाबाद विद्यापीठाचे बी. एम.  मुळे,  जळगाव विद्यापीठाचे एम. एस. पगारे, उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. धनंजय माने, नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य गणेशचंद्र शिंदे, लोणेरे विद्यापीठाचे एस. बी. देवसारकर, मुंबई विद्यापीठाचे संजय देशमुख आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे पुणे विद्यापीठाबाहेरील इच्छूक आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2