अभियांत्रिकी पदविकेतील नापास विद्यार्थ्यांना मिळणार संधी! चंद्रकांत पाटील यांची घोषणा

आता पदविका अभ्यासक्रमासाठी हा निर्णय घेण्यात आल्याने पदवी अभ्यासक्रमासाठीही ही मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकी पदविकेतील नापास विद्यार्थ्यांना मिळणार संधी! चंद्रकांत पाटील यांची घोषणा
Minister Chandrakant Patil

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील अभियांत्रिकी पदविका (Engineering Diploma) अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षात अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र किंवा वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी एक वेळ संधी देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने (Higher and Technical Education) घेतला आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे ५८ हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ही माहिती दिली आहे. पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत विद्यार्थी हितास्तव एक विशेष बाब म्हणून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र / वर्षाचे सत्रकर्म पुर्ण करण्यासाठी एक वेळ संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज घेतला.

SPPU News : ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’साठी सरकार तिजोरी उघडणार का?

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील साधारणतः २२ हजार विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्याकरीता तसेच ३६ हजार विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे सत्र कर्म पुर्ण करण्याकरीता संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. याचा सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, पदवी अभ्यासक्रमांमध्येही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी देण्याची मागणी युवासेनेच कल्पेश यादव यांनी केली आहे. याबाबत अद्याप तंत्र शिक्षण विभाग सकारात्मक नाही. आता पदविका अभ्यासक्रमासाठी हा निर्णय घेण्यात आल्याने पदवी अभ्यासक्रमासाठीही ही मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo