Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित; राजकारण तापलं

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही रखडल्या असताना आता बहुचर्चित  मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूकही रातोरात स्थगित करण्यात आली आहे.

Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित; राजकारण तापलं
Mumbai University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील बहुतेक सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या सिनेट निवडणुका (Senate Election) पार पडल्या आहेत. मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) निवडणूकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. पण अचानक ही निवडणूक स्थगित करण्यात येत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले. या निर्णयाचा फटका राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अंमलबजावणीसह प्रशासकीय व शैक्षणिक कामांनाही बसणार आहे. दरम्यान, निवडणूक रद्द झाल्याने आता राजकारण चांगलंच तापलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही रखडल्या असताना आता बहुचर्चित मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूकही रातोरात स्थगित करण्यात आली आहे. तर  दुसरीकडे राज्यातील सर्व सार्वजानिक विद्यापीठांच्या सिनेटच्या निवडणुका झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचा निवडणूक कार्यक्रम आठवडाभरापूर्वी जाहीर होऊनसुद्धा अचानक ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यामुळे मुंबई विद्यापीठातील अधिकार मंडळाच्या इतर निवडणुकाही लांबणीवर पडणार आहेत. याचा थेट परिणाम NEP च्या अमंलबजावणीवर होणार आहे. 

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला घरघर; विद्यार्थ्यांना पदवीनंतरच हवी नोकरी

विशेष म्हणजे १० सप्टेंबरला १० सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. जवळपास ९५ हजार नोंदणीकृत पदवीधर मतदार यंदा मतदान करणार होते.  उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस होता. ठाकरे गटाच्या युवा सेना आणि मनसे विद्यार्थी सेनने आपआपल्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची तयारीही केली होती. आज फोर्ट येथील विद्यापीठाच्या प्रांगणात दोन्ही संघटनांकडून शक्तीप्रदर्शनही केले  जाणार होते.  मात्र, काल रात्री उशिरा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने कुलगुरुंची बैठक घेत निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 

स्थगितीचे कारण अस्पष्ट

विद्यापीठाने निवडणुकीला स्थगिती दिल्याचे  परिपत्रक काढले आहे. पण या परिपत्रकात निवडणुकीला स्थगिती का दिली जात आहे याचे  कोणतेही सबळ कारण दिलेले  नाही. परिपत्रकात फक्त शासन पत्राच्या आदेशाचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान   मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवा सेनेने सिनेटच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. तर यावर्षी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे ही निवडणूक लढवणार होती. त्यामुळे विद्यापीठातील राजकीय वातावरण बरेच पेटले होते. 

विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा सामना रंगणार होता. तर दुसरीकडे भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसच्या एनएसयूआयची मतदार नोंदणी तुलनेने  कमी झाली  होती. त्यामुळे सिनेटच्या निवडणुका स्थगित करण्यामागे राजकीय हेतू असू शकेल, अशा चर्चांना उधाण आले असून शिवसेना ठाकरे गट व मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo