क्लस्टर शाळा हव्या की नको? तज्ज्ञांमध्ये टोकाचे मतभेद

राज्यभरात २० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या चार हजार ८९५ अधिक शाळा आहेत, त्या शाळांमध्ये आठ हजार २२६ शिक्षक आहेत, तर सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

क्लस्टर शाळा हव्या की नको? तज्ज्ञांमध्ये  टोकाचे मतभेद
ZP Cluster School Kamshet

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये (Schools) अत्यावश्यक सोयीसुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांच्या (Students) गुणवत्ता विकासात येणाऱ्या अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी 'क्लस्टर शाळा' (Cluster School) ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. सध्या या विषयावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने चर्चा सुरु आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना अनेक अत्याधुनिक सुविधा मिळतील, असे  काही तज्ज्ञांचे मत आहे. तर ही योजना म्हणजे शिक्षण हक्काच्या गळ्याला नख लावणारी ठरेल, असा दावा काही तज्ज्ञांकडून केला जात आहे. 

राज्यभरात २० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ४ हजार ८९५ अधिक शाळा आहेत, त्या शाळांमध्ये ८  हजार २२६ शिक्षक आहेत, तर सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. कमी पटसंख्येमुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात अडचणी येतात, अशी शिक्षण विभागाची धारणा आहे. या कमी पटसंख्या असलेल्या शाळांना एकत्र आणून एक शाळा करणे म्हणजेच क्लस्टर शाळा.

हेही वाचा : ऐकावं ते नवलच! गाण्यांच्या चालीवर पाठ करा गणिताची सूत्र; भांडारकर गुरूजींचा अनोखा फंडा

याविषयी 'एज्युवार्ता' शी बोलताना शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक म्हणाले, राज्यात क्लस्टर शाळांमुळे दुर्गम भागातील शाळा कालांतराने बंद होतील, दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातील, हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे राज्य शासनाने क्लस्टर शाळेचा प्रयोग करू नये. आपल्या लोकशाहीतले सरकार लोक कल्याणकारी असणे अपेक्षित आहे, त्यामुळे नवउदारमतवादी भांडवली विचारांनी भारलेले निर्णय घेणे सरकारने थांबवावे. कितीही आकर्षक आणि सोयीची वाटली तरी क्लस्टर स्कूल योजना शिक्षण हक्काच्या गळ्याला नख लावणार, हे नक्की!

माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे म्हणाले, "अत्यल्प विद्यार्थी असलेल्या शाळेत सर्व भौतिक सुविधा, तंत्रज्ञान आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार नाही. अशा शाळांतील विद्यार्थ्यांना ज्ञान, आकलन, तर्क, अनुमान, विश्लेषण क्षमता संवर्धन करणे शक्य होणार नाही. म्हणून संकुल संकल्पना शैक्षणिक दृष्ट्या योग्य आहे. क्लस्टरवर सर्वोत्तम दर्जाचे ज्ञानी, प्रशिक्षण पूर्ण केलेले अद्ययावत शिक्षक असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान रचनावादी अध्ययन पद्धतीचा लाभ होऊन विद्यार्थीच ज्ञानाची निर्मिती करतील. त्यांना एकविसाव्या शतकातील सर्व आव्हाने पेलणे शक्य होईल.

हेही वाचा : Balbharati : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, सुट्टीत अभ्यासाची चिंता सोडा, इथे घरबसल्या शिका!

"अत्यल्प विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांतून दर्जेदार शिक्षण न मिळाल्यामुळे विद्यार्थी निरस शिक्षणाला कंटाळून शाळा सोडून देतील आणि राष्ट्राचे व समाजाचे न भरून निघणारे नुकसान होईल. म्हणून अद्ययावत नव्या युगाची आव्हाने समर्थपणे पेलणारे शिक्षक द्यायचे असेल तर संकुल पद्धती शिक्षण देणे उत्तम राहील. गावातील, वाडी, तांड्यावरील, पाड्यावरील उपेक्षित, वंचित विद्यार्थी आंतरराष्ट्रीय शिक्षण प्राप्त करून सक्षम आणि समर्थ होतील," अशी आशा नांदेडे यांनी व्यक्त केली. संकुलावर विद्यार्थ्यांना सर्व सुविधा, पुस्तके, वह्या, भोजन, कपडे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संगणक शिक्षण देण्यात येणे मात्र आवश्यक आहे, अशी अपेक्षाही नांदेडे यांनी व्यक्त केली.

खबरदारी घ्यायला हवी

''कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेत अक्षर, अंक ओळख होईल. पण विद्यार्थ्यांचा सामाजिक स्तर हा अधिक विद्यार्थी असणाऱ्या शाळेतच सुधारतो. क्लस्टर शाळा ही योजना चांगली असली तरी ग्रामीण व दुर्गम भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यापासून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या घरापासून शाळेत ने आण करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे . एक शिक्षक विद्यार्थ्याला सर्व गोष्टी देऊ शकत नाही. त्यामुळे क्लस्टर शाळेचा विचार करायला हरकत नाही.''

- एन के जरग, माजी शिक्षण संचालक