Breaking : आठवीच्या शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर; इथे पाहता येणार निवडयादी

परीक्षेसाठी १ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र राज्यासाठी १९ हजार ६८२ शिष्यवृत्ती कोटा निश्चित करण्यात आला आहे.

Breaking : आठवीच्या शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर; इथे पाहता येणार निवडयादी
Scholarship Examination Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा (NMMS) निकाल व निवडयादी गुरूवारी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी १ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र राज्यासाठी १९ हजार ६८२ शिष्यवृत्ती कोटा निश्चित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांनी दिली. (Class 8th Scholarship Result Announced maharashtra state  council of examination)

शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. ही शिष्यवृत्ती इ. ९ वी ते १२ वी पर्यंत चार वर्षांसाठी मिळते. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा एक हजार रुपये करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी १० फेब्रुवारी रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना /पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक आदी बाबतची दुरुस्ती असल्यास १७ फेब्रुवारीपर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या.

हेही वाचा : बोगस शाळा : एजंट शिवाय शिक्षण विभागाची फाईलच हलत नाही!

विद्याथ्र्यांनी/पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्याची निवडयादी गुरुवारी (दि. २७) जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी चार टक्के आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्यार्थ्यांची संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हयानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे.

निवडयादी व गुणयादी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल. शाळांनी व विद्यार्थ्यांनी हा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावा लागेल. विद्यार्थ्याचे गुणपत्रक काही दिवसांनी शाळा लॉगीनवर देण्यात येईल. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत केले जाणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.