‘शालार्थ आयडी’चा बाजार; लिपिकाने शाळेतील शिपायाकडे मागितले ५० हजार अन् अडकला सापळ्यात

शालार्थ आयडी हा सध्या या विभागातील कळीचा मुद्दा बनला आहे. शालार्थ आयडीशिवाय शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात अडवणूक होत आहे.

‘शालार्थ आयडी’चा बाजार; लिपिकाने शाळेतील शिपायाकडे मागितले ५० हजार अन् अडकला सापळ्यात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

राज्याच्या शिक्षण विभागातील (Education Department) भ्रष्टाचाराची (Corruption) प्रकरणे सातत्याने बाहेर येत आहेत. विविध कारणांसाठी शिक्षक (Teachers) तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरत त्यांच्याकडून आर्थिक वसुली सुरू असल्याची अनेक प्रकार समोर आले आहेत. शालार्थ आयडीसाठी (Shalarth ID) अडवणूक केली जात आहे. नाशिक (Nashik) येथीळ शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकाला बुधवारी एका प्रकरणात ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला होता. नाशिक येथील शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रकरण ईडीकडे देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार राम सातपुते यांनी उपस्थित केला होता. शालार्थ आयडी हा सध्या या विभागातील कळीचा मुद्दा बनला आहे. शालार्थ आयडीशिवाय शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात अडवणूक होत आहे.

शिक्षक भरतीबाबत मोठी अपडेट : पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी मुदतवाढ, शिक्षण आयुक्तांची माहिती

 

नाशिक मधील प्रकरणात बुधवारी दिगंबर अर्जुन साळवे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात एका खासगी शाळेतील शिपायाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांना शिपाई पदावर कार्यरत आहेत. मात्र, त्यांना नेमणुक दिनांकापासून आजपर्यंत कोणतेही वेतन मिळालेले नव्हते. हे वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ आयडी मिळण्यासाठी शाळेमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता.

प्रस्ताव मंजूर करण्यासाठी नाशिक मधील शिक्षण उपसंचालक कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या साळवे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीकडून तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आले. त्यानंतर कार्यालयात सापळा रचण्यात आला.

 

लाचेची रक्कम ५० हजार रुपये स्वीकारताना साळवे यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयातच रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती एसीबीचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j