मुद्रांक निरीक्षक पदाची तात्पुरती निवड व गुणवत्ता यादी जाहीर ; ऑप्टिंग आऊटचा पर्याय खुला

मुद्रांक निरीक्षक पदाची तात्पुरती निवड व गुणवत्ता यादी जाहीर ; ऑप्टिंग आऊटचा पर्याय खुला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा - 2022 या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी १ / मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या 78 पदांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या आधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आऊटचा (Opting out) पर्याय मागविण्यात आला आहे.

एमपीएससीच्या संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांच्या अर्जामध्ये विविध जागांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी झाल्यानंतर काही उमेदवारांच्या शिफारसीमध्ये बदल होऊ शकतो. उमेदवारांना ऑप्टिंग आऊटचा पर्याय देण्यात आला असून येत्या  22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना हा पर्याय देता येतील.

हेही वाचा : एका तलाठी पदासाठी ३० लाख रुपये...काय म्हणाले रोहित पवार

ऑप्टिंग आऊटचा पर्याय सादर केल्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश केला जाणार नाही. ऑप्टिंग आऊटचा पर्याय सादर करताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर व टोल फ्री क्रमांकावर किंवा ईमेल आयडी वर संपर्क साधावा, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.