Breaking News : विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला 

शुक्रवारी पेपर फुटीची घटना समोर आल्यामुळे रद्द करण्यात आलेला पेपर  आता येत्या 26 डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत घेतला जाणार आहे.

Breaking News : विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला 

एज्युवार्ता  न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)परीक्षा विभागातर्फे सध्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी एमबीए प्रथम वर्ष (MBA first year)प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस (Legal Aspect of Business) या विषयाची परीक्षा होती.  मात्र, चिखली येथील डी वाय पाटील कॉलेज (DY Patil College at Chikhali)येथून प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पुणे , अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. ऑक्टोबर 2023 या सत्राची परीक्षा  21 नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू झाली आहे. त्यात एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा 11 डिसेंबर पासून सुरू झाली आहे.  22 डिसेंबर रोजी एम बी ए 2009 रिवाईज प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार होती.  परंतु तत्पूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका  सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू


परीक्षेचे संवेदनशीलता गोपनीयता व पवित्र लक्षात घेता विद्यापीठाने पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पेपर फुटीची घटना समोर आल्यामुळे रद्द करण्यात आलेला पेपर  आता येत्या 26 डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत घेतला जाणार आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
------

"विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने हा पेपर रद्द केला आहे. चिखली येथील डी वाय पाटील कॉलेजमधून या विषयाची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे."


- डॉ. महेश काकडे,संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ