एका तलाठी पदासाठी ३० लाख रुपये...काय म्हणाले रोहित पवार

नोकर भरतीच्या प्रत्येक परीक्षेसाठी १ हजार रुपये परीक्षा फी उकळणंही योग्य नाही.

एका तलाठी पदासाठी ३० लाख रुपये...काय म्हणाले रोहित पवार
Rohit Pawar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Rohit Pawar News : '' वारंवार होणाऱ्या पेपरफुटीविरोधात कायदा करण्यासाठी राज्य सरकार मात्र ठोस प्रयत्न करत नाही, हे योग्य नाही. शिवाय नोकर भरतीच्या प्रत्येक परीक्षेसाठी १ हजार रुपये परीक्षा फी उकळणेही योग्य नाही. तसेच तलाठी पदासाठी झालेल्या परीक्षेतही पेपर फुटला होता. एका तलाठी पदासाठी ३० लाख रुपये घेण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगत आहेत,अशी  माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नागपुर येथे माध्यमांशी बोलत दिली. 

रोहित पवार म्हणाले, '' राज्यात सुमारे ४ हजार ५०० पदांसाठी भरती झाली होती. यामध्ये हजार पदांसाठी घोटाळा झाला असेल  तर त्याची एकत्रित रक्कम ३ हजार कोटी रुपयांच्या घरात जाते. त्यामुळे तीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. पेपर फुटीसंदर्भात कायदा करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर कायदा केला जाणार आहे. समिती नेमण्याची गरज नव्हती. १० दिवसांमध्ये कायदा करता आला असता. मात्र, सरकार चालढकल करत असल्याचाही आरोप पवार यांनी केला.

हेही वाचा : मेगा भरती : UPSC NDA, NA 2024 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

राज्यात ६० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत आणि या खात्याचे मंत्री मात्र खोटे बोलत आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी शालेय शिक्षण विभागाचा (School Education Department) समाचार घेतला. शिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी आणि शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या हजारो युवांना न्याय मिळण्यासाठी रिक्त असलेली शिक्षकांची ६० हजार पदं तातडीने भरावीत, अशी मागणी त्यांनी केली. शासनाने कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी मागच्या दाराने कंत्राटी शिक्षकांची भरती केली जात असल्याचेही  रोहित पवार म्हणाले.