आदिवासी विकास भरतीला ब्रेक; मराठा आरक्षणामुळे दिली स्थगिती

पदभरती प्रक्रिया स्थगित करत मराठा आरक्षणासह (एसईबीसी) नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

आदिवासी विकास भरतीला ब्रेक;  मराठा आरक्षणामुळे दिली स्थगिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत आदिवासी विकास विभागाकडून (Department of Tribal Development) विविध १९ संवर्गातील ६०२ पदांसाठी मेगा भरती (Mega Recruitment for 602 Posts) राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १३ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु सुरू केलेली पदभरती प्रक्रिया स्थगित (Recruitment process suspended) करत मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) (एसईबीसी) नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार ही पदभरती जाहिरात तूर्त स्थगित करण्यात आली असल्याचे आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी शासकीय प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. 

आदिवासी विकास विभागामार्फत जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले असून त्यात नमूद करण्यात आले आहे की, आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या स्तरावरुन दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी आदिवासी विकास विभागामधील ६०२ विविध रिक्त पदांकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. सदर विविध पदांकरीता उमेदवारांची ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत.

दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) या संवर्गाचा समावेश करुन जाहिरात पुनश्च प्रसिध्द करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार पुनश्च बिंदूनामावली अद्ययावत करुन गट-क संवर्गासाठी पुनश्च जाहीरात प्रसिध्द करण्याबाबत शासन स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.