‘महानिर्मिती’चा फुटलेला पेपरच केला जगजाहीर; आता SIT चौकशी होणार का?

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी म्हणजे महानिर्मितीचा (MahaGenco) सरळसेवा भरतीचा पेपर फुटल्याचा दावा केला जात आहे.

‘महानिर्मिती’चा फुटलेला पेपरच केला जगजाहीर; आता SIT चौकशी होणार का?
Mahagenco

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मंत्रिपद असलेल्या ऊर्जा विभागाचा (Power Department) भरतीचा पेपर फुटल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. आता समितीने हा फुटलेला पेपरच सोशल मीडियावर (Social Media) टाकत जगजाहीर केला आहे. फुटलेल्या पेपरचा काही भागच प्रसिध्द करत असून संपूर्ण पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा समितीने केला आहे. (Competitive Examination)

 

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी म्हणजे महानिर्मितीचा (MahaGenco) सरळसेवा भरतीचा पेपर फुटल्याचा दावा केला जात आहे. खाजगी कंपनीकडून १३ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर हायटेक पध्दतीने फोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचेही समितीने म्हटले होते. त्यानुसार फुटलेला पेपर जाहीर करण्यात आला आहे.

Barti News : MPSC च्या मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना १५ हजार मिळणार

 

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समितीने हा पेपर टाकला आहे. समितीने म्हटले आहे की, हा पेपर ज्युनिअर सिक्युरिटी ऑफिसर पदाच्या दुसऱ्या टप्प्यातील साइकोमेट्री टेस्टचा आहे. हा पेपर ऑफलाईन होता आणि विभागाकडून सबमिट करून घेण्यात आला होता, म्हणजे पेपरचा फोटो बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता. पण अत्याधुनिक हाय-टेक कॅमेरा वापरून सदर पेपर फोडून परीक्षा केंद्राबाहेर पाठविण्यात आला आहे.

 

पेपरचा एकच भाग क्रॉप करून जाहीर करत आहोत, कारण पूर्ण फोटो जाहीर केल्यास, तो पूर्ण फोटो नक्की कोणता आहे आणि कुणी पाठविला, हे  घोटाळेबाजांना समजेल आणि ज्या व्यक्तीने आम्हाला हा फोटो पाठविला आहे त्याच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे समितीने म्हटले आहे.

 

महानिर्मितीचे नक्की किती पेपर फुटले आहेत, किती घोटाळेबाज याप्रकारे उत्तीर्ण झाले आहेत? या घोटाळ्यामध्ये नक्की कोण-कोण सामील आहेत. या सर्वांसाठी महानिर्मितीच्या संपूर्ण भरती प्रक्रियेची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली SIT चौकशी करण्यात यावी. स्टेज-१ मधील पेपर फुटल्याची शक्यता आहे, त्यामुळे महानिर्मितीने याप्रकरणाची रीतसर FIR दाखल करावी आणि सरकारने SIT स्थापन करण्याची तत्काळ घोषणा करावी, अशी मागणी समितीने केली आहे. महानिमिर्ती किंवा पोलीस विभागाने संपर्क केल्यास पेपरचा पूर्ण फोटो आणि इतर पुरावे सादर करू, असे आवाहन समितीने केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k