विद्यापीठात बैठक उधळून लावली पण तोडफोड केली नाही : ABVP चा दावा

अभाविप कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांना घेऊन पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली. त्यासंदर्भात प्रसारित झालेल्या बातम्यांवर अभाविपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

विद्यापीठात बैठक उधळून लावली पण तोडफोड केली नाही : ABVP चा दावा
ABVP Protest in SPPU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) सुरू असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली. यावेळी तोडफोड झाल्याची छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाली होती. पण अभाविपकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. बैठक उधळून लावली पण तोडफोड केली नाही, असे अभाविपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (ABVP claims that Savitribai Phule Pune University was not vandalized)

अभाविप कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांना घेऊन पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली. त्यासंदर्भात प्रसारित झालेल्या बातम्यांवर अभाविपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सोमवारी काही प्रमुख मागण्यांना घेऊन अभाविप पुणे महानगरातील कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन केले. ह्या मागण्यांचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला वारंवार दिले असतानाही त्याकडे ठरवून दुर्लक्ष विद्यापीठ प्रशासनाने केले. शेवटचा पर्याय म्हणून, ह्या प्रमुख मागण्यांना घेऊन अभाविप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले, असे अभाविपकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : ABVP च्या मागण्या मान्य ; पण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यास विद्यापीठाकडून सुरूवात

आंदोलनाबाबत पूर्व परवानगी पत्र देखील संबंधित पोलिस स्टेशनला आधीच दिले होते. आंदोलन सुरू झाल्यानंतर विद्यापिठाच्या मुख्य इमारतीच्या इथे मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. एकीकडे विद्यापीठामध्ये दारूच्या बाटल्या, तलवार, बंदूक घेऊन rap song करण्यास विद्यापीठ प्रशासन तोंडी परवानगी देते. विषय बाहेर आल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई करत नाही. दुसरीकडे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दडपण्यासाठी मात्र विद्यापीठ प्रशासन पोलीस फौजफाटा बोलावते हे अत्यंत वेदनादायी दृश्य अभाविप कार्यकर्त्यांसाठी होते. अभाविपला अपेक्षा होती की सन्माननीय कुलगुरु हे बाहेर येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून निवेदन स्वीकारतील. परंतु त्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष करून बैठक सुरू ठेवली, असा दावा अभाविपकडून करण्यात आला आहे.

अभाविप कार्यकर्ते सभागृहाच्या उजव्या दरवाजा बाहेर बसले होते. त्याच दरवाज्याने आत आले आणि कुलगुरूंसमोर मागण्या मांडल्या. काही प्रसार माध्यमे व विशिष्ट राजकीय नेत्यांकडून "तोडफोड झाली" ही अतिशय चुकीची बातमी पसरवली गेली. अभाविप कार्यकर्ते ज्या सभागृहातील उजव्या बाजूस असलेल्या दरवाजामधून आत मध्ये आले तो दरवाजा अजून देखील नीट अवस्थेत आहे. जी तथाकथित तोडफोड झाली असा कांगावा काही प्रसार माध्यमे व राजकीय नेते करीत आहेत त्याचा आणि अभाविप चा दुरान्वये ही संबंध नाही असे मत पुणे महानगर मंत्री शूभंकर बाचल यांनी सांगितले.