ब्रेकिंग न्यूज : विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. पराग काळकर याची नियुक्ती

विद्यापीठ कायद्यात बदल केल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कलगुरूंची निवड करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार शनिवारी डॉ. पराग काळकर यांची प्र - कुलगुरू पदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रेकिंग न्यूज : विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. पराग काळकर याची नियुक्ती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (savitribai phule pune university ) प्र-कुलगुरू (pro.vice chancellor) पदी डॉ. पराग काळकर  (Dr. parag kalakar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शनिवारी (दि.२६ ) याबाबत निर्णय घेण्यात आला, असे विश्वसनीय विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.मात्र, विद्यापीठाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाल्यानंतर आता प्र-कुलगुरू म्हणून कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. कुलगुरूंच्या निवडीनंतर 80 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही त्यावर निर्णय झाला नव्हता. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ.संजय चाकणे यांची नावे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. त्यामुळे प्र-कुलगुरू पदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधान आले होते. गेल्या महिन्यात मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे नाव मागे पडले. 

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार पूर्वी विद्यापीठाचे कुलपती अर्थात राज्यपालयांच्या कडून प्र -कुलगुरूंची निवड केली जात होती. परंतु, विद्यापीठ कायद्यात दुरूस्ती  केल्यानंतर विद्यापीठाचे  कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कलगुरूंची निवड करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार शनिवारी डॉ. पराग काळकर यांची प्र - कुलगुरू पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

डॉ. पराग काळकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत आहेत. काळकर हे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या शर्यतीत होते. पहिल्या पाच उमेदवारांमध्ये ते आले होते. आता त्यांना प्र-कलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने यापुढील काळात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत.
    विद्यापीठाचे घसरलेले रँकिंग, उशिरा लागणारे निकाल अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. विद्यापीठातील विविध विभाग व संलग्न महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राबवाव्या लागणाऱ्या उपाय योजनांचे नियोजन त्यांना करावे लागणार आहे.