रॅप साँग प्रकरणी राज्यपालांनी विचारला विद्यापीठाला जाब ?

राज्यपाल यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून या प्रकरणाचा अहवाल तयार करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

रॅप साँग प्रकरणी राज्यपालांनी विचारला विद्यापीठाला जाब ?
Rap song at pune University

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) चित्रित केलेल्या वादग्रस्त रॅप सॉंग प्रकरणी आता थेट महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor of Maharashtra) व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस (Ramesh Bais) यांनीच जाब विचारला आहे. तसेच या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर सादर करून पुढील कार्यवाही करण्याबाबत विद्यापीठाला सुनावले आहे, असे पुणे विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये मद्याची बाटली, तलवार, पिस्तूल वापर करून एका रॅप साँगचे ( rap song) चित्रीकरण करण्यात आले. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने रॅपर शुभम जाधवसह त्याच्या इतर सहकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. सोमवारी या समितीची पहिली बैठक पार पडली. परंतु आता स्वतः राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.

हेही वाचा : ABVP च्या मागण्या मान्य ; पण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यास विद्यापीठाकडून सुरूवात

राज्यपाल यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून या प्रकरणाचा अहवाल तयार करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणी यांच्या अध्यक्षतेखाली रॅप साँग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीकडून अहवाल केव्हा सादर केला जातो आणि यावर विद्यापीठ प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.         

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, युक्रांद, स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड आदी विद्यार्थी संघटनांनी याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे. अभाविपकडून सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून याबाबत प्रशासनाला धारेवर धरले. त्यावरूनही विद्यार्थी संघटना आणि प्रशासन आमनेसामने आले आहे.