स्पर्धा परिक्षांच्या क्लासेसचा किळसवाणा बाजार! महेश झगडेंना विश्वासच बसला नाही...

मी कधीही एमपीएससीच्या मुलांकडे जाऊन कधीही सांगत नाही तुम्ही एमपीएससी करा. मी नेहमी सांगतो, तुम्ही प्लॅन 'ए' हा इतर ठेवा आणि प्लॅन 'बी' म्हणून स्पर्धा परिक्षांकडे पहा, असेही झगडे म्हणाले.

स्पर्धा परिक्षांच्या क्लासेसचा किळसवाणा बाजार! महेश झगडेंना विश्वासच बसला नाही...
Ex IPS Mahesh Zagade

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे (Mahesh Zagade) यांनी स्पर्धा परिक्षांच्या क्लासेसबाबत (Competitive exam Classes) रोखठोक मत व्यक्त केले आहे. क्लासेसचा किळसवाणा बाजार सुरू असल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत ट्विट करत झगडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टॅग करत यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. स्पर्धा परिक्षांबाबतची सध्याची स्थिती अत्यंत भयानक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्पर्धा परीक्षांचा (Competitive exam students) अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांचे धगधगते वास्तव सांगणाऱ्या ‘यथावकाश’ या चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा नुकताच पुण्यात झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर झगडे यांनी सध्याच्या स्थितीबाबत आपली परखड मते मांडली. चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अविनाश शेंबेटवाड यांनी केले असून ते स्वत: तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत.

हेही वाचा : हॅकरच्या दाव्यावर MPSC कडून मोठा खुलासा; विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती, प्रश्नपत्रिकेबाबत स्पष्टीकरण

चित्रपट पाहिल्यानंतर बोलताना झगडे यांनी चित्रपटात जे घडते ते सध्या तसेच आहे का, अशी विचारणा केली. त्यावर उपस्थितींनी होकारार्थी उत्तर दिले. हे ऐकून झगडे म्हणाले, चित्रपटात जे घडते, ते असेच असेल असे मला वाटले नव्हते. हे अत्यंत भयानक आहे. मी विचारच करू शकत नाही. आम्ही जेव्हा परीक्षा दिल्या त्यावेळी एकदा दिल्या आणि पास झालो. चित्रपटात जे काही दाखविले आहे, त्यावर विश्वासच बसत नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशी अपेक्षा झगडे यांनी व्यक्त केली.

https://twitter.com/maheshzagade07/status/1650684865006952449?s=46&t=OxM727Ygr5iCsgZBV0xCqQ

चार लाखांतून ३००-४०० मुले निवडली जातात. मी कधीही एमपीएससीच्या मुलांकडे जाऊन कधीही सांगत नाही तुम्ही एमपीएससी करा. मी नेहमी सांगतो, तुम्ही प्लॅन ए हा इतर ठेवा आणि प्लॅन बी म्हणून स्पर्धा परिक्षांकडे पहा. मुलांच्या कुटुंबांना, त्यांनाही त्रास होतो. हे थांबायला हवे. त्यासाठी प्रत्येक ग्रामसभेत हा चित्रपट दाखवायला हवा. आई-वडिल, तेथील मुलांनाही समजेल की, काय सुरू आहे, पुढे काय करायचे, असे झगडे यांनी सांगितले.

झगडे यांनी याबाबत ट्विट करून चित्रपट राज्यात सर्व ग्रामसभांमध्ये दाखविण्याची गरज असल्याचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिंदे, मुख्यमंत्री कार्यालय आणि मंत्री गिरीश महाजन यांना टॅग करण्यात आले आहे. भयानक परिस्थिती आहे. राज्य शासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. हा चित्रपट शासनाने सर्व ग्रामीण भागात पोहोचेल असे पाहणे आवश्यक असल्याचे झगडे यांनी म्हटले आहे.